वृत्तसंस्था : भारतीय लोकांचं क्रिकेटप्रेम जगापासून कधी लपून राहिलेलं नाही. भारतात कोट्यवधींच्या संख्येनं क्रिकेटवेडे आहेत. मात्र भारतातील क्रिकेट अगदी काल-परवापर्यंत केवळ मुंबई, दिल्लीसारख्या मोजक्या शहरांपर्यंत मर्यादित होतं. पण मागील दीड दशकामध्ये ही परिस्थिती बदलली असून अनेक राज्यांमधून क्रिकेटपटू पुढे येऊन चमकदार कामगिरी करताना दिसत आहेत. क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारांकडूनही वेगवेगळे प्रयत्न अगदी छोट्या छोट्या राज्यांमध्ये होताना दिसतात. अशाच एक प्रयत्नांचा भाग म्हणून एका नव्या क्रिकेट स्टेडियमच उद्घाटन नुकतच पार पडलं ते थेट आसाममध्ये!
आसाममधील पायाभूत क्रीडा सुविधांना चालना देण्यासाठी, मुख्यमंत्री डॉ. हिमंता बिस्वा सरमा यांनी शुक्रवारी नव्या क्रिकेट मैदानाचं लोकार्पण केलं. उमरांगसो या डोंगराळ शहरामधील दिमा हासाओ येथे हे अत्याधुनिक क्रिकेट स्टेडियम उभारण्यात आलं आहे. या क्रिकेट मैदानाचं स्थान अत्यंत निसर्गरम्य ठिकाणी असून हे ठिकाण ईशान्येकडील सर्वात निसर्गरम्य क्रिकेट मैदानांपैकी एक ठरु शकतं असं सांगितलं जात आहे.आसाम क्रिकेट असोसिएशनच्या (एसीए) मालकीच्या या स्टेडियममध्ये एका वेळेस १५ हजार प्रेक्षक बसू शकतात. १५ हजार क्षमतेची मातीची गॅलरी म्हणजे वास्तुशिल्पाचा एक अद्वितीय असा नमुना असून मैदानावरील आकर्षणांपैकी एक आहे. आधुनिक क्रीडा डिझाइनला स्थानिक मुलामा देण्याचा प्रयत्न यामधून करण्यात आला आहे. या कॉम्प्लेक्समध्ये सेंगा तुलाराम पॅव्हेलियन देखील आहे. खेळाडू आणि अधिकाऱ्यांसाठी सुसज्ज एक आधुनिक रचना असलेलं हे पॅव्हेलियन अंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट स्टेडियमवरील पॅव्हेलियनसारखेच आहे.







