मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका अंतिम टप्यात आल्या आहेत. त्यामुळं महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी तसंच कार्यकर्ते आपल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार करण्यात व्यग्र आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपा उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
“महिलांसाठी सुरू केलेली ‘लाडकी बहीण योजना’ बंद करण्याचा राज्य सरकारचा कोणताही हेतू नाही. तसंच शेतकऱ्यांसाठी मोफत वीज योजना सुरूच राहील. राज्यातील सौर प्रकल्प सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना २४ तास वीज पुरवठा मिळेल,” असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. “काही लोकांचा असा दावा आहे की, भाजपाला (निवडणुकीत) लोकप्रिय जनादेश मिळाल्यानं सरकार आता लाडकी बहीण आणि इतर योजना बंद करेल. लाडकी बहीण योजना मागील एक वर्षापासून सुरू आहे. मी मुख्यमंत्री असेपर्यंत ही योजना बंद होणार नाही. आम्हाला आमच्या बहिणींना रोजगार देऊन ‘लखपती दीदी’ बनवायचं आहे”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आयोजित रॅलीला संबोधित करताना म्हणाले.







