पुणे : पुण्यात प्रदूषण होत असल्याने पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी शहरात शेकोट्यांना बंदी घातली आहे, हा निर्णय नक्कीच स्वागतार्ह आहे. मात्र, त्यानंतर काही प्रश्न उपस्थित होतात. पुण्यात प्रदूषण फक्त शेकोट्यांनीच होते का? रस्त्यांवरील खड्डे आणि इमारतींच्या बांधकामांमुळे हवेत पसरणारे धुळीचे कण याचे काय? पुण्याच्या मध्यवर्ती भागात केवळ पावसाळ्यात नदी असल्याची जाणीव करून देणारी मुठा पावसाळा संपल्यावर कशी दिसते, याकडेही थोडेतरी लक्ष दिले जाते का? बंद पडलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पांचे काय?… ही प्रश्नांची जंत्री वाढत जाणारी आहे. त्यामुळे प्रदूषणाविरोधात आता पुणेकरांनी मशाली पेटविण्याची वेळ आली आहे. पुण्यात आल्हाददायक हवा असल्याने निवृत्तीनंतर येथे राहण्यास अनेकजण प्राधान्य देतात. त्यामुळे ‘निवृत्तांचे शहर’ अशी उपाधी मिळालेल्या पुण्याच्या हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यास विविध गोष्टी कारणीभूत ठरत आहेत. त्यावर उपाय म्हणून शेकोटी पेटविण्यास बंदीचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे. प्रदूषण रोखण्यासाठी किमान एक पाऊल उचलण्यात आले, हेही नसे थोडके.
शहरातील गृहनिर्माण संस्था, व्यावसायिक संकुले, निवासी परिसरांमध्ये सुरक्षा कर्मचारी थंडीपासून बचाव करण्यासाठी उघड्यावर शेकोट्या पेटवतात. काही भागांत नागरिक लाकूड, कचरा किंवा कोळसादेखील जाळतात. यामुळे पुणे शहरातील हवा प्रदूषण वाढत चालले आहे. त्यामुळे शहरात शेकोटी पेटविण्यास बंदी घालण्यात आली आहे. या शेकोट्यांसाठी कोळसा, जैविक पदार्थ (बायोमास), प्लास्टिक, रबर आणि अन्य कचरा जाळण्यात येत असल्याने धूर होतो. त्यामुळे प्रदूषणात भर पडत आहे. त्यामुळे नागरिकांनी उघड्यावर कचरा टाकल्यास महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून दंडात्मक कारवाई होणार आहे. शेकोट्या पेटवल्यामुळे धूर, कार्बन मोनोऑक्साइड यासह अन्य हानिकारक वायूंचे उत्सर्जन होऊन त्याचा श्वसनावर गंभीर परिणाम होऊन दमा आणि अन्य श्वसनाचे आजार होत असल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे हा घेतलेला निर्णय योग्य असला, तरी प्रदूषण फक्त शेकोटीमुळेच होते का? पुणे महापालिकेकडून दरवर्षी पर्यावरण सद्यस्थिती अहवाल तयार केला जातो. २०२४ चा अहवालही प्रसिद्ध झाला आहे. त्यामध्ये प्रदूषण होण्याची विविध कारणे, महापालिका करत असलेल्या उपाययोजना यांची माहिती देण्यात आली आहे. कागदोपत्री हा अहवाल चांगला दिसत असला, तरी प्रत्यक्षात अंमलबजावणीचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे दिवसेंदिवस पुण्याची हवा खालावलेली दिसते.







