मुंबई : लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना ई केवायसी करणे अनिवार्य केले आहे. जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुम्हाला यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाहीये. दरम्यान, ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहे. १८ नोव्हेंबरपर्यंत महिलांना ई केवायसी करण्यास सांगितले आहे. १८ नोव्हेंबरपर्यंत सर्व महिलांचे केवायसी होणार नाही, असं महिलांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी केवायसीसाठी मुदतवाढ करण्याची मागणी केली होती. याबाबतच आदिती तटकरेंनी मोठी घोषणा केली आहे.
आदिती तटकरेंनी ई केवायसीच्या मुदतवाढीबाबत माहिती दिली. लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसीसाठी अंतिम तारीख ही १८ नोव्हेंबर आहे. साधारणपणे रोज ५ लाख महिलांचे केवायसी वेबसाइटवर पूर्ण होत आहे. आतापर्यंत १ कोटी लाडक्या बहिणींचे केवायसी पूर्ण झाले आहे, असं त्यांनी सांगितले. लाडकी बहीण योजनेत केवायसीसाठी मुदत वाढणार का, असा प्रश्न आदिती तटकरेंना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी सांगितले की, मध्यंतरी मराठवाडा, सोलापूर, धाराशीव येथे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्या ठिकाणी महिलांची अनेक कागदपत्रे घायाळ झाली. त्यांचे नुकसान झाले. त्यामुळे त्यादृष्टीने केवायसीसाठी मुदतवाढ देण्याबाबत विचार सुरु आहे. लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल, असं आदिती तटकरेंनी सांगितलं.







