विरार : विरारकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता मुंबई महानगर क्षेत्रातील वाहतूक कोंडीवर तोडगा निघाला आहे. उत्तन वसई विरार सी लिंक या प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे.फक्त पर्यावरण विभागाची मान्यता मिळाली नव्हती. मात्र, आता या विभागानेही परवानगी दिल्याने या प्रकल्पाचं काम लवकरच सुरु होईल. या प्रकल्पामुळे पालघर, वसई-विरार आणि डहाणूमधीन नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या प्रोजेक्टमुळे विरारवरुन थेट मरीन ड्राइव्ह गाठता येणार आहे.
विरार ते साउथ मुंबईचा प्रवास एकदम सुसाट होणार आहे. मरीन ड्राइव्हपर्यंतचा प्रवास सिग्नलमुक्त होणार आहे. सध्या विरार ते वर्सोवा या अंतरासाठी दोन तास लागतात. परंतु हा सागरी पूल हे अंतर दीड तासाने कमी करणार आहे. तुम्ही फक्त ४५ मिनिटांत विरार ते मरीन ड्राईव्हपर्यंत पोहचू शकतात. यामुळे पश्चिम द्रुतगती मार्ग आणि ट्रेनवरील ताण कमी होणार आहे. हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे पूर्ण होणार आहे. या प्रकल्पाला ८७ हजार कोटी रुपये खर्च होता. मात्र, आता हा खर्च ५२,६५२ कोटीपर्यंत आणण्यात आला आहे. या प्रकल्पाचे काम लवकरच सुरु होणार आहे. या प्रकल्पाला मंजुरी मिळाली असली तरीही याचा खारफुटी आणि वनजमिनीवर परिणाम होणार आहे. या प्रकल्पासाठी विशेष उद्देश वाहन स्थापन करण्याच्या सूचना पर्यावरण विभागाने दिल्या आहेत. विरार ते मरीन ड्राईव्ह हा सागरी पूल ५५.१२ किमी लांबीचा असणार आहे. मुख्य सागरी पूल हा २४.३५ किमी लांब असणार आहे. हा पुल वर्सोवा भाईंदर दहिसर कोस्टल रोडशी जोडला जाणार आहे. तर पुढे दिल्ली ते मुंबई एक्सप्रेसवेशी जोणार आहे.







