कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यासह कोकण आणि कर्नाटकात धुमाकूळ घालणार्या अक्षय राजू शेलार (वय २५, मूळ रा. भगतसिंग चौक, जवाहरनगर, सध्या रा. राशीन, ता. कर्जत) या सराईत चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गजाआड केले आहे. त्याच्याकडून विविध ठिकाणाहून चोरलेल्या १० लाख २५ हजार रुपये किंमतीच्या तब्बल १५ मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. तर त्याच्या साथीदाराचाही शोध सुरु आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, कोल्हापूर जिल्ह्यातील वाढत्या वाहन चोरीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना गुन्हे उघडकीस आणण्यासंदर्भात पोलिस अधिक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी सुचना केल्या होत्या. त्यानुसार कळमकर यांनी पथक नेमून तपासाच्या सूचना केल्या होत्या. तपासादरम्यान रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अक्षय शेलार याने त्याच्या साथीदारांसह कोल्हापूर जिल्ह्यास कोकण व कर्नाटक भागातून मोटरसायकली चोरल्याची व तो शाहू टोल नाका परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार उपनिरिक्षक शेष मोरे व त्यांच्या पथकाने सापळा रचून अक्षय शेलार याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेली बुलेट त्याने वडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याची कबुली दिली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरिक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.







