रत्नागिरी : रत्नागिरीकरांचं लवकरच विमान प्रवासाचं स्वप्न पूर्ण होणार आहे. येत्या काही महिन्यांत रत्नागिरी विमानतळावरून विमान सेवा सुरू होणार आहे. लवकरच या विमानतळाचे काम पूर्ण होईल. यामुळे रत्नागिरीबाहेर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी, शेतकऱ्यांची मुलं – मुली, सामान्यांना विमानातून प्रवास करण्याचा लाभ मिळणार आहे.
याबाबत मंत्री उदय सामंत म्हणाले की, मार्च २०२६ अखेरपर्यंत रत्नागिरी विमानतळाचं काम पूर्ण होईल, अशी माहिती आहे. याबाबतचे नियोजन सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. टर्मिनल बिल्डिंगच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती राहावी यासाठी प्रयत्न सुरू आहे. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली, असं उदय सामंत यांनी सांगितलं. दरम्यान, काल मतचोरीच्या आरोपांबाबत काहींनी केलेल्या वक्तव्यांवर उत्तर देताना सामंत म्हणाले की, ‘रत्नागिरीकरांनीच त्यांना उत्तर दिलं आहे. सलग ३ वेळा त्यांचं पराभव झालं आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावं. काहीही निमित्त शोधून माझ्याविरोधात बोलणं ही त्यांची भूमीका आहे’, असं सामंत म्हणाले.







