मुंबई : ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वारंवार घडत असल्याचे समोर येत आहे. सरकारकडून तसेच पोलिसांच्या माध्यमातून या सर्व घटनांना बळी न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तरीही सामान्य जनतेची फसवणूक काही थांबत नाही. अशातच मुंबई शहरातील पोलिस कॉन्स्टेबलसोबत धक्कदायक प्रकार घडला आहे. सायबर ठकांनी एका कॉन्स्टेबलच्या खिशातून फसवणूक करून हजारो रुपये उकळले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले कॉन्स्टेबल सचिन चव्हाण (वर्षे ५२) यांना ९ सप्टेंबर रोजी अज्ञात क्रमांकावरून फोन आला. चव्हाण यांनी फोन उचलला असता त्यांना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या खात्यावर चुकून ३० हजार रुपये पाठवल्याचे सांगितले. प्रत्यक्षात मात्र तसे काही नव्हते. तरीही या अज्ञात व्यक्तीने चव्हाण यांना पैसे परत करण्याची विनंती केली. सुरुवातीला चव्हाण यांनी ५,००० रुपये पाठवले. त्यानंतर ठकाने लिंक पाठवून कोड टाकण्यास सांगितले. कोड भरताच त्यांच्या एचडीएफसी पगार खात्यातून आधी ७७,०९१ रुपये आणि नंतर आणखी १२,०१२ रूपये वजा झाले. काही वेळानंतर चव्हाण यांना संशय आला. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच चव्हाण यांनी तात्काळ १९३० हेल्पलाइनवर संपर्क साधला. संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१९(२) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.







