वृत्तसंस्था : राज्यात इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सेवेला सरकारने महाराष्ट्र बाईक-टॅक्सी नियमांतर्गत नुकतीच परवानगी दिल्यामुळे सर्वसामान्यांना प्रवासासाठी अजून एक पर्याय उपलब्ध झाला आहे. बाइक टॅक्सीमुळे जवळचा प्रवास, शिवाय गर्दीच्या ठिकाणी जाण्यासाठी तसंच एका व्यक्तीसाठी हा सर्वात्तम पर्याय आहे. एका माणसासाठी टॅक्सी पैशाने महाग पडतो. त्यात बाईक-टॅक्सी आता सर्वसामान्यांचा प्रवास सोप्या करणार आहे. आता राज्य सरकारने या बाइक टॅक्सीचे भाडेदर निश्चित केलं आहे. तसंच हा निर्णय तात्काळ लागू करण्यात येणार असल्याचेही परिवहन विभागाकडून सांगण्यात आलं आहे. राज्य सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सेवेला परवानगी देऊन मोटार वाहन अधिनियम, १९९८च्या कलम ७३ व ९६ नुसार या सेवेचे भाडेदर ठरवण्यात आले आहे. त्यानुसार इलेक्ट्रिक दुचाकी टॅक्सींसाठी प्रति किलोमीटर १०.२७ रुपयांप्रमाणे प्रवासी भाडे घेतलं जाणार आहे.
इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सेवेचा पहिला टप्पा १.५ किमी चा असून प्राथमिक भाडे १५ रुपये इतके अनिवार्य राहणार आहे. म्हणजेच प्रवास कितीही छोटा असो, किमान १५ रुपये भाडे द्यावे लागणार आहे. त्यानंतर प्रत्येक किलोमीटरसाठी प्रवाशांना १०.२७ रुपये मोजावे लागणार असल्याची माहिती परिवहन विभागाकडून दिली गेली आहे. पहिल्या टप्प्यात ही सेवा केवळ मुंबई पुरतीच मर्यादीत राहणार असंही परिवहन विभागाकडून सांगण्यात आले आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाने सध्या उबेर इंडिया, रॅपिडो ट्रान्सपोर्टेशन आणि अॅनी टेक्नॉलॉजीज या तीन कंपन्यांना तात्पुरता “मुंबई महानगर क्षेत्रासाठी प्रोव्हिजनल लायसन्स” मंजूर दिल्या गेल्या आहेत. या परवान्याची मुदत ३० दिवसांची असून, त्यानंतर अंतिम लायसन्ससाठी अर्ज करणे बंधनकारक असणार आहे. तात्पुरत्या परवान्यातील सर्व अटी-शर्ती मान्य करूनच कंपन्यांना पुढील परवाना दिला जाणार आहे, असं परिवहन विभागाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक याबद्दल सांगितलं आहे की, इलेक्ट्रिक दुचाकी टॅक्सींच्या माध्यमातून वाहतुकीवरील ताण कमी करण्याचा हा प्रयत्न असणार आहे. तसंच प्रदूषणाला आळा बसण्यास याची मदत होणार आहे. प्रवाशांना स्वस्त, सोयीस्कर आणि पर्यावरणपूरक प्रवासाची सुविधा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, ही सेवा मुंबईव्यतिरिक्त राज्यातील अन्य शहरांमध्ये कधी सुरू होणार, याबाबत परिवहन विभागाकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.







