नवी दिल्ली : भारतीय रेल्वेनं तिकीट बुकिंग प्रक्रियेत होणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. येत्या १ ऑक्टोबर २०२५ पासून IRCTC च्या वेबसाइट आणि मोबाईल अॅपवर ऑनलाइन तिकीट आरक्षणाच्या प्रक्रियेत मोठा बदल करण्यात येत आहे. या नव्या नियमानुसार, आरक्षण सुरू झाल्यानंतर पहिल्या १५ मिनिटांसाठी फक्त आधार पडताळणी झालेल्या वापरकर्त्यांनाच तिकिटं बुक करण्याची परवानगी असेल. म्हणजेच, ज्या वापरकर्त्यांचं IRCTC खातं आधार क्रमांकाशी लिंक केलेलं आहे आणि पडताळणी पूर्ण झाली आहे, तेच यावेळी बुकिंग करू शकतील. सध्या ही अट फक्त ‘तत्काळ बुकिंग’ प्रक्रियेसाठी लागू होती. मात्र, १ ऑक्टोबरपासून ती सामान्य आरक्षणासाठीही लागू होणार आहे.
रेल्वे प्रशासनाचा हा निर्णय प्रवाशांच्या दृष्टीनं सकारात्मक पाऊल ठरू शकतो, कारण त्यामुळे अधिकृत आणि खरे वापरकर्तेच वेळेत तिकिटं बुक करू शकतील. जर तुमचं IRCTC खातं अद्याप आधार क्रमांकाशी लिंक नसेल, तर १ ऑक्टोबरपूर्वी ते पूर्ण करणं आवश्यक आहे. रेल्वेनं जाहीर केलं आहे की, १ ऑक्टोबर २०२५ पासून आरक्षण सुरू झाल्यानंतर पहिल्या १५ मिनिटांत फक्त आधार पडताळणी झालेल्या वापरकर्त्यांनाच आरक्षित जनरल तिकिटांचं ऑनलाइन बुकिंग करता येईल. ही अट केवळ IRCTC वेबसाइट आणि मोबाईल अॅप यावरून तिकीट बुक करणाऱ्यांसाठी लागू असेल. यामुळे तत्काळ बुकिंग सुरू होताच तिकीट काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशांवर थेट परिणाम होईल. रेल्वेच्या या निर्णयाचा उद्देश तिकीट बुकिंग प्रक्रियेत पारदर्शकता आणणं आणि फसवणुकीला आळा घालणं हा आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे की, नवीन नियम फक्त ऑनलाइन बुकिंगसाठी लागू होईल. संगणकीकृत पीआरएस काउंटरवरून तिकीट घेणाऱ्यांसाठी वेळापत्रक आणि प्रक्रियेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्याचप्रमाणे, अधिकृत तिकीट एजंटांसाठी आरक्षण सुरू झाल्यानंतर पहिल्या १० मिनिटांत तिकीट बूक न करण्याची अट यापुढेही लागू राहील. रेल्वेला असा विश्वास आहे की, या पावलामुळे तिकीट बुकिंग प्रक्रियेत पारदर्शकता येईल आणि एजंट किंवा दलालांकडून तिकिटे ब्लॉक करण्याच्या प्रकारांना आळा बसेल. यामुळे सामान्य प्रवाशांना लवकर आणि सहज तिकीट बूक करण्याची संधी उपलब्ध होईल. हे पाऊल डिजिटल सुरक्षा आणि प्रवाशांच्या सोयी लक्षात घेऊन उचलण्यात आलं असून, येणाऱ्या सण-उत्सव आणि प्रवास हंगामात खऱ्या प्रवाशांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.







