पुणे : शहरातील रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी, प्रमुख रस्त्यांवर सर्रास उभी केली जाणारी वाहने, त्यावर नसलेले नियंत्रण या पार्श्वभूमीवर वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी पुणे महापालिकेकडून शहरातील प्रमुख सहा रस्त्यांवर ‘पे अँड पार्क’ आणि वाहने थांबविण्यास बंदी असलेले क्षेत्र (नो हॉल्टिंग झोन) लागू करण्याचा विचार केला जात आहे.
महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर सात वर्षांपूर्वी (मार्च २०१८ मध्ये) शहरातील पाच प्रमुख रस्त्यांवर ‘नो पार्किंग’, ‘नो हॉल्टिंग’, काही भागांत ‘पे अँड पार्क’चा निर्णय घेण्य़ात आला होता. तत्कालीन लोकप्रतिनिधींनी या धोरणाला मान्यतादेखील दिली. मात्र, त्याची अंमलबजावणी झाली नाही. ‘आयुक्त नवल किशोर राम यांनी वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने एक पाऊल म्हणून प्रमुख सहा रस्त्यांवर ‘पे अँड पार्क’, तसेच चौकांमध्ये ५० मीटरपर्यंत ‘नो पार्किंग’ आणि ‘नो हॉकर्स’ झोन करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यासाठी पोलीस आयुक्त, तसेच वाहतूक पोलिसांशी चर्चा करण्यात आली आहे. लवकरच या निर्णयावर शिक्कामोर्तब होईल,’ असे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी यांनी सांगितले. ‘सात वर्षांपूर्वी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजुरी दिलेल्या पाच रस्त्यांमधील काही रस्ते वगळून आणि त्यामध्ये नवीन रस्त्यांच्या समावेश करून एकूण सहा रस्त्यांवर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल,’ असे महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
या रस्त्यांवर ‘पे अँड पार्क’ –
- जंगली महाराज रस्ता
- नामदार गोखले (फर्ग्युसन) रस्ता
- लक्ष्मी रस्ता
- बिबवेवाडी
- बालेवाडी हायस्ट्रीट
- विमाननगर







