पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचं मिश्कीलपणे बोलणं सर्वांनाच माहिती आहे, अजित पवार कधी काय बोलतील याचा नेम नसतो. अशातच आज अजित पवारांनी एका हॉटेलच्या उद्घाटनाला हजेरी लावली, यावेळी बोलताना अजित पवारांचा मिश्कील अंदाज दिसून आला. हॉटेल मालक मला म्हणाले अजित दादा नाष्टा करुन जा, पण आज खरंच वेळ नाही. पुढच्या वेळी आलो की नक्की जेवण करेन. तेव्हा मात्र माझं बिल घेऊ नका, अशी मिश्किल टिपणी अजितदादांनी केली. पुढे म्हणाले, पण हा चेष्टेचा भाग झाला. मी स्पष्ट सांगतो. राजकारण आणि व्यवसाय स्वतंत्र ठेवा. हॉटेलमध्ये कोणी ही येऊ द्या, बिल सर्वांचं घ्या. असं केलं नाही तर दिवाळं निघेल. हॉटेल बंद करण्याची वेळ येईल, असं ही पुढे अजित पवारांनी म्हटलं आहे.
हनुमंत रावांनी मला दादा बसा थोडंसं नाश्ता पाणी करा म्हटलं, पण मला खरोखर आज वेळ नाही. परत कधीतरी मी जेवायला येईन. तेव्हा माझं बिल घेऊ नका, असं हसत हसत अजित पवारांनी म्हटलं. माझं जेवण बाकी राहिले असं समजा. हा गमतीचा भाग जाऊ द्या परंतु मला हनुमंत रावांना सांगायचंय आणि तुम्हाला पण सांगायचं तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असला तरी कामाच्या ठिकाणी काम करा आणि राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करा. व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून उद्या कोणीही आलं, मी आलो दिलीपराव आले, किंवा आणखी कोणी आलं, तरी बिल देत चला. पैसे घेत जावा. रीतसरपणे जे असेल ते बील द्या, उगाच आपल्या जवळचा आहे, हे आलं, ते आलं, त्यांना कसं नाराज करायचं, याला कशाला नाराज करायचं, या नाराजीमध्ये आपलं हॉटेल बंद पडायची वेळ येईल असं म्हणत सर्वांकडून बिल घेत जावा असं अजित पवारांनी म्हटलं आहे.







