मुंबई : मुंबईतील भाईंदर येथे परप्रांतीय तरुणाने तीन मराठी तरुणांवर जीवघेणा हल्ला केल्याचं समोर आलं आहे. व्यावसायिक वादातून हा हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. भूषण पाटील, रुपेश पाटील आणि नितेश पाटील यांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले आहे. या तिघांवर तातडीने भाईंदरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, ते सध्या उपचार घेत आहेत. ५-६ परप्रांतीय तरुणांनी हा हल्ला केला. ५ ऑगस्टला भाईंदर पश्चिमेतील रेल्वे स्टेशन परिसरात घडली आहे.
मराठी एकीकरण समितीने परप्रांतीय गुंडांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. “पोलिसांची भीतीच उरलेली नाही, परप्रांतीय गुंड खुलेआम दादागिरी करत आहेत. अशा गुंडांना तात्काळ अटक झाली नाही, तर आम्ही पुन्हा मोर्चा काढू,” असा इशारा मराठी एकीकरण समितीने दिला आहे. याआधी काही दिवसांपूर्वीही मराठी साठी मोर्चा काढण्यात आला होता. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. मिळालेल्या माहितीनुसार, भाईंदर रेल्वे स्थानकावरील एका कामाचा ठेका मराठी तरुणांकडे आला होता. तर आरोपी परप्रांतीयांचा ठेका रद्द करण्यात आला होता. ठेका का रद्द करण्यात आला ? याची चौकशी करण्यासाठी आरोपी रेल्वेच्या पश्चिम विभागीय कार्यालयात आले होते. त्या वेळी तिथे उपस्थित असलेल्या मराठी तरुणांवर अचानक हल्ला चढवण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे. यात पाच ते सहा तरुण तिघांना मारहाण करत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. आरोपी तरुणांच्या हातात धारधार शस्त्र असून त्यांनी तरुणांना जबर मारहाण करत जखमी केले आहे. त्यानंतर तरुणांना भाईंदरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. हल्लादरम्यान आरोपींनी “मराठींना येथे काम करू देणार नाही,” अशी खुलेआम धमकी दिल्याचेही आरोप होत आहे. या गंभीर प्रकारानंतर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. गेला काही दिवसांपासून मुंबईतून सातत्याने अशा घटना समोर येत आहेत .या प्रकरणी पोलीस नक्की काय कारवाई करतात याकडे मुंबईकरांचे लक्ष आहे.







