मुंबई : उच्च न्यायालयाने मुंबईतील सर्व कबुतरखाने बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर मुंबई महानगर पालिकेकडून त्यासंदर्भात कारवाई करण्यात आली. मुंबईतील कबुतरखाने बंद झाल्यानंतर त्यावर जैन समाजाकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला. यासंदर्भात सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकही झाली. या बैठकीत राज्य सरकार या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करेल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. मात्र, यानंतरही आज मुंबईच्या दादरमध्ये जैन समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. दादर येथील कबुतरखान्यावर आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मोठ्या संख्येनं आंदोलक जमले. त्यांनी तेथील कबुतरखान्यावर टाकण्यात आलेली ताडपत्री फाडली. काही यानंतर आंदोलक आत शिरले व त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्यांना अडवून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यानंतरही आंदोलकांनी आतमध्ये शिरून राडा घालायला सुरुवात केली. त्याचबरोबर सोबत आणलेलं कबुतरांसाठीचं खाद्यदेखील त्यांनी तिथे पसरवून टाकलं.
दरम्यान, कबुतरखान्यावर टाकलेली ताडपत्री आंदोलकांनी काढल्यानंतर तिथे झाकण्यासाठी केलेलं लाकडी बांबूंचं बांधकामदेखील आंदोलकांनी तोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिथे मोठ्या प्रमाणावर पोलीस उपस्थित होते. मात्र, पोलिसांनी वारंवार सांगितल्यानंतरदेखील आंदोलकांनी कबुतरखान्याजवळ तोडफोड करत आतमध्ये प्रवेश केला. दादरला जमलेल्या आंदोलकांनी कबुतरखान्यांसाठीचं आंदोलन कधी स्थगित झालंच नव्हतं, असा दावा केला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर राज्य सरकारच्या पुढील कार्यवाहीसाठी हे आंदोलन स्थगित झाल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, असं काहीही झालेलं नसून अशी अफवा राजकीय हेतूने पसरवण्यात आल्याचा दावा काही आंदोलकांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. तसेच, न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होईपर्यंत हे कबूतर उपाशी मरणार का? असा सवालही आंदोलकांकडून करण्यात आला.







