ठाणे : कल्याणमधील बेतुरकरपाडा येथील एका ३१ वर्षीय रहिवाशाचा डेंग्युने मृत्यू झाला आहे. या रुग्णावर सोमवारपासून कल्याण डोंबिवली पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार सुरू होते. रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने रुग्णालय प्रशासनाने या रुग्णाच्या नातेवाईकाला मुंबईत शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्याचे सूचित केले होते. पण, नातेवाईकांनी त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. या रुग्णाचा उपचारा दरम्यान गुरूवारी मृत्यू झाला.
विलास भगवान म्हात्रे असे या मृत रुग्णाचे नाव आहे. ते बेतुरकरपाडा भागात कुटुंबीयांसमवेत राहत होते. पालिका हद्दीत पावसाळा सुरू झाल्यानंतर प्रथमच डेंग्युची बाधा होऊन एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने या रुग्णाच्या मृत्यूनंतर पालिका साथ आजार नियंत्रणासाठी प्रभावी उपाय करत असल्याचे जाहीर केले असले तरी कल्याण, डोंबिवली शहराच्या विविध भागात उघड्यावर पदार्थ विकणाऱ्या वडापाव, पाणीपुरी, भेळपुरी आणि इतर खाद्यपदार्थांच्या गाड्या राजरोस सुरू आहेत. संध्याकाळच्या वेळेत या गाड्या नागरिकांनी गजबजूुन गेलेल्या असतात. फेरीवाला हटाव पथकांच्या संगनमताने या गाड्या सुरू असल्याचे सांगितले जाते.







