पुणे : मद्य विक्री करणाऱ्या दुकानातील दरवाज्याचे कुलूप तोडून चोरट्याने गल्ल्यातील १५ हजारांची रोकड लांबविल्याची घटना कल्याणीनगर भागात घडली. चोरट्यांनी मद्याच्या बाटल्या फोडल्याचे उघडकीस आले. याबाबत सचिन अंगदराव मुसळे (वय ३१, रा. आदर्शनगर) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगर रस्त्यावरील कल्याणीनगर भागात प्रकाश वाईन्स हे मद्य विक्रीचे दुकान आहे. चोरट्यांनी मद्य विक्री दुकानाचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. गल्ल्यातील १५ हजारांची रोकड लांबविली, तसेच चोरट्याने दुकानातील मद्याच्या बाटल्या फोडल्या. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी मद्य विक्री दुकानाच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले आहे. सहायक पोलीस निरीक्षक नंदनवार तपास करत आहेत.







