मुंबई : पुण्यातील हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगाराने मालकाला गोळ्या घालण्याची व मुंबईत बॉम्ब ब्लास्ट घडवून आणण्याची धमकी दिल्यांनतर सर्वच यंत्रणा सतर्क झाल्या. हॉटेल मालकाने याबाबत पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून याबाबतची माहिती दिली. त्यानंतर पुणे पोलिसांनी याबाबतची माहिती मुंबई पोलिसांना दिली.
पुणे शहर पोलिसांच्या नियंत्रण कक्षाकडून मुंबई पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला संदीप गाडे नावाच्या व्यक्तीने सोमवारी मध्यरात्री दूरध्वनी केला. गाडे कोथरूडमधील इंदिरा नगर येथील रहिवासी असून त्यांच्या साताऱ्यातील हॉटेलमध्ये संदीप सिंह कामगार म्हणून कामाला होता. दोन दिवसांपूर्वी तो नोकरी सोडून निघून गेला. त्याने गाडे यांना दूरध्वनी करून गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली. तसेच मुंबईत ब्लास्ट करेन अशी धमकी दिली. या माहितीनंतर तात्काळ कोथरूड पोलिसांनी गाडे यांच्याकडून घटनेची माहिती घेतली. तसेच मुंबई पोलिसांनाही याबाबतची माहिती देण्यात आली. त्यानंतर मुंबईतील सर्व यंत्रणांना सतर्क करण्यात आले. नियमाप्रमाणे सर्व यंत्रणांना कळवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.







