मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी ठाणे ते मुंब्रा ट्रेन अपघातामध्ये झालेल्या मृत्यूबाबत दुःख व्यक्त केले. या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी आहेत. या महाभयानक घटनेनंतर राज ठाकरे यांनी महायुतीच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या राज्य सरकारवर तोफ डागली असून सडकून टीका केली आहे. राज ठाकरे यांनी याबाबत एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यात निशाणा साधला. राज यांच्या म्हणण्यानुसार वास्तविक मुद्द्यांऐवजी राज्य सरकार केवळ निवडणुकांवर लक्ष केंद्रीत करत आहे.
वृत्तसंस्था ANI मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, मनसे प्रमुखांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, “आज मुंबईत झालेला रेल्वे अपघात दुर्दैवी आहे. या अपघातात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला, परंतु मुंबईत दररोज अशाच घटना घडत आहेत. मुंबईत दररोज प्रवासी जखमी होत आहेत आणि तरीही कोणीही मदत करण्यासाठी काहीही करत नाही.” ते म्हणाले, “आमचे संपूर्ण लक्ष फक्त निवडणुका आणि प्रचारावर आहे. राज ठाकरे-उद्धव ठाकरे युती करतील का? या प्रश्नापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे आज मुंबईत प्रवास कसा चालला आहे, शहरांमध्ये आणि संपूर्ण राज्यात लोक कसे राहत आहेत.” या प्रश्नाकडे कोणालाच लक्ष द्यावेसे वाटत नाही.







