मुंबई : भारतातील सर्वात वर्दळीच्या महामागांपैकी एक असलेल्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाढत्या वाहतुकीची गर्दी कमी करण्यासाठी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचे अपग्रेडेशन प्रस्तावित केले आहे. सध्याच्या सहापदरीवरून १० पदरी सुपर हायवे तयार करण्यात येणार आहे. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या सुटणार आहे.
मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय महानगराला पुण्यासारख्या औद्योगिक आणि शैक्षणिक केंद्राशी जोडणारा ९६ किलोमीटरचा हा महत्त्वाचा मार्ग आहे. वेगवान प्रवासासाठी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेचा वापर केला जातो. सध्या आठवड्याच्या दिवशी दररोज अंदाजे ६५,००० वाहने ये-जा करतात. शनिवार-रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी वाहनांची संख्या १ लाखांपेक्षा जास्त असते. दरवर्षी वाहतुकीचे प्रमाण अंदाजे ५-६% वाढते. वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे एक्सप्रेसवेचा विस्तार करण्यात येणार आहे.







