पुणे : राज्य मंडळामार्फत यंदा राज्यभरात अकरावी प्रवेश प्रक्रिया केंद्रीय, ऑनलाइन पद्धतीने राबविली जात आहे. यात येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करून अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवार दि. २६ मे पासून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहे. तसेच पहिल्या नियमित फेरीची अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी ८ जूनला जाहीर होणार आहे.अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख मंगळवारी ३ जूनला फक्त, दोन दिवस बाकी आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांनी लवकर अर्ज सादर करण्याचे आव्हान शिक्षण संचालनालयामार्फत करण्यात आले आहे. अकरावी प्रवेशासाठी राज्यातून आतापर्यंत १० लाख ३३२ विद्याध्यर्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. पहिल्या नियमित फेरीत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना मंगळवारपर्यंत अर्ज करता येणार आहे.
अकरावीच्या प्रवेशास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी तीन जूनला सायंकाळी सहापर्यंत नोंदणी करण्यासाठी मुदत दिली आहे. प्रवेशासाठी विद्यार्थी नोंदणी आणि प्राधान्यक्रम निश्चितीसह प्रत्यक्ष अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या अंतर्गत विद्यार्थी त्यांच्या प्राधान्यक्रमाच्या यादीत किमान एक ते कमाल १० उच्च माध्यमिक विद्यालयांचा समावेश करू शकतात. अर्जात दिलेल्या पसंतीक्रमानुसार आरक्षण, गुण यांच्या आधारे प्रवेशासाठी महाविद्यालयाचे वाटप केले जाणार आहे. एकाच वेळी विद्यार्थी कोटपांतर्गत प्रवेशासाठी देखील अर्ज करू शकतील. प्रत्येक फेरीसाठीविद्यार्थ्याने संमती नोंदविणे आवश्यक आहे. प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीत प्रवाह आणि पसंतीक्रम अद्ययावत करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी पाच जूनला तर अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी आठ जूनला जाहीर होईल.







