मुंबई : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात महिलांवरील अत्याचाऱ्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. असे असताना आता शरीरसुख देण्यास नकार दिल्याच्या रागातून पतीने चक्क आपल्या पत्नीलाच पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मुंबईतील आरसीएफ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.
मुंबईत पत्नी कामावर जातानाच पतीने पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केली. मात्र, उशिर होत असल्यामुळे पत्नीने नकार दिला. याचा राग मनात धरून पतीने रॉकेल टाकून पत्नीला पेटवून दिले. मिळालेल्या माहितीनुसार, चेंबूरमधील वाशीनाका परिसरात ही घटना घडली असून, आरोपीला शनिवारी दुपारी अटक केली आहे. या घटनेत महिला ७० टक्के भाजली असून, तिच्यावर पालिकेच्या सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, ३० मे रोजी पत्नी सकाळी कामावर जाण्यासाठी तयारी करत होती. मात्र, तिच्या पतीने सकाळी तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली होती. पण, उशीर होत असल्याने पत्नीने त्याला नकार दिला. हाच नकार नराधम पतीला पचनी पडला नाही. त्यामुळे तो चांगलाच संतप्त झाला. याच संतापाच्या भरात त्याने पत्नीवर थेट रॉकेल ओतून तिला पेटवून दिले.







