मुंबई : बेस्ट बसचे प्रवास भाडे आजपासून वाढविण्यात आले असून सर्वसाधारण बसचे किमान भाडे ५ रुपयांवरून १० रुपये, तर वातानुकुलित बसचे किमान भाडे ६ रुपयांवरून १२ रुपये करण्यात आले आहे. त्याचबरोबर मुंबईच्या हद्दीबाहेत जाणाऱ्या बस प्रवाशांना वाढलेले बसभाडे आणि त्यावर २ रुपये जास्त द्यावे लागणार आहेत. बेस्ट उपक्रमाच्या सुधारित प्रवाभाड्याची अंमलबजावणी ९ मेपासून करण्यात आली. जे बसमार्ग मुंबई महापालिकेच्या हद्दीतून इतर महापालिकांच्या हद्दीत प्रवर्तित होतात त्या बसमार्गावरील प्रवासभाड्यामध्ये म्हणजेच मुंबई महानगरपालिका हद्दीबाहेर पथकर नाक्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून विना-वातानुकूलित आणि वातानुकूलित बस सेवेवर २ रुपये अतिरिक्त प्रवासभाडे आकारण्यात येणार आहे. बेस्टच्या तिकीट यंत्रणेत तसे बदल करण्यात आले आहेत.
बेस्ट उपक्रमाचे अनेक बसमार्ग मुंबईच्या बाहेरही जात असतात. पश्चिम उपनगरात भाईंदरपर्यंत तर पूर्व उपनगरात वाशीपर्यंत बसगाड्या जातात. मुंबई बाहेर असलेल्या पथकर नाक्यांवर बेस्टच्या गाड्यांवर प्रतिफेरी १५० रुपये इतका पथकर भरावा लागतो. त्यामुळे वार्षिक ८ कोटी रुपये भार बेस्टवर येतो. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. बेस्टची सेवा ही केवळ मुंबईपर्यंत असली तरी काही बसमार्ग हे मुंबईला लागून असलेल्या महापालिकांच्या हद्दीत जातात. मुंबईला लागून असलेल्या मीरा भाईंदर आणि नवी मुंबई महापालिका हद्दीत बेस्टच्या बसगाड्या जातात. त्याला प्रवाशांकडून प्रतिसादही असतो. मात्र या प्रवाशांना आता २ रुपये जास्तीचे द्यावे लागणार आहेत. बेस्टच्या गाडयांना पथकर माफ करावा, अशी मागणी बेस्ट प्रशासनाने राज्य सरकारकडे केली आहे. मात्र अद्याप ती मागणी मान्य झाली नाही. एकेकाळी दिवसाला ४५ लाख प्रवासी घेऊन धावणाऱ्या बेस्टचे प्रवासी दिवसेंदिवस कमी होत आहेत. तर दुसरीकडे बेस्टची वार्षिक तूटही वाढत आहे. त्यामुळे संचित तूट आठ हजार कोटींवर गेली आहे.







