मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील काही भागात शुक्रवारी रात्री उशिरा अचानक पाऊस पडला. दक्षिण मुंबईतील काही भागात, विशेषतः मध्य उपनगरे, ठाणे, डोंबिवली, कल्याण, नवी मुंबई आणि पनवेल भागात पावसाच्या सरी कोसळल्या. राज्यातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस आणि काही भागात गारपीट झाल्याचे वृत्त आहे.
कोल्हापूरमधील हातकणंगले, सांगलीतील कसबेडीगड आणि जत येथे प्रत्येकी १०-१० मिमी पावसाची नोंद झाली. तथापि, हवामान खात्याने पुढील दोन ते तीन दिवस मुंबईतील हवामान कोरडे राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. राज्यातील हवामान पावसासाठी अनुकूल आहे. परंतु, हवामान खात्याने अद्याप मुंबईत पावसाचा कोणताही अंदाज जारी केलेला नाही. हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे चंद्रपूर, नागपूर, वर्धा आणि गडचिरोली येथे जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच बीड, परभणी, सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये गारपीट वादळाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातही जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तीन दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. परंतु, विदर्भात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. रविवारी कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, जालना, वाशीम, अमरावती, नागपूर, गोंदिया, भंडारा, यवतमाळ आणि गडचिरोली, चंद्रपूरमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोमवारी वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूरमध्ये यलो अलर्ट तर भंडारा आणि गोंदियामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.







