पुणे : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. दरमहा दहा हजार रुपये हप्ता देण्याची मागणी केल्यानंतर पैसे देण्यास नकार देणाऱ्या दुकानदारावर वस्ताऱ्याने वार केल्याची घटना लष्कर परिसरात घडली आहे. नंतर त्याने दहशत देखील माजवली होती.
दरम्यान, दहशत माजविणाऱ्या या वस्तारा गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली. आफताब अब्दुल शेख उर्फ अप्पी (वय २४, रा. गल्ली क्रमांक १०, भीमपूरा, लष्कर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत जाकिर ताजिउद्दीन कुरेशी (वय ५५, रा. व्ही. पी. स्ट्रीट, भोपळे चौक, लष्कर ) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, कुरेशी यांचे लष्कर भागातील व्ही. पी. स्ट्रीट परिसरात दुकान आहे. शेख बुधवारी (९ एप्रिल) सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास कुरेशी यांच्या दुकानात आला. त्याने कुरेशी यांच्याकडे दरमहा दहा हजार रुपये हप्ता मागितला. कुरेशी यांनी त्याला पैसे देण्यास नकार दिला. नंतर त्याने खिशात ठेवलेला वस्तरा बाहेर काढला आणि त्यांच्यावर उगारला. हप्ता न दिल्यास व्यवसाय करु देणार नाही, अशी धमकी दिली. तसेच, कुरेशी यांच्या डाव्या हाताच्या बोटावर वस्ताऱ्याने वार केला. त्यानंतर शेखने वस्तरा उगारून परिसरात दहशत माजविली. शेख याला पोलिसांनी अटक केली असून, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत तरटे तपास करत आहेत.







