पुणे : शहरातील शासकीय वसतिगृहांमध्ये बाहेरून खाद्य मागविण्यास अद्याप नियमाने आडकाठी नसली, तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने ऑनलाइन डिलिव्हरी सेवेबाबत काही नियमावली करण्याची चाचपणी वसतिगृहे करत आहेत. ऑनलाइन डिलिव्हरीच्या निमित्ताने घरात घुसून होणारे गैरप्रकार, तसेच या माध्यमातून बेकायदा वस्तू, पदार्थ पोहोचविण्याची शक्यता लक्षात घेऊन ही नियमावली तयार करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मोशी येथील शासकीय वसतिगृहात खाण्यासाठी बाहेरून पिझ्झा मागविल्याने, संबंधित विद्यार्थिनींचा वसतिगृहामधील प्रवेश एक महिन्यासाठी रद्द करण्याची नोटीस बजावून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून समज देण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. या पार्श्वभूमीवर, शासकीय वसतिगृहांचा आढावा घेतला असता, समाजकल्याण विभागाची वसतिगृहे वगळता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे महापालिकेच्या वसतिगृहात बाहेरून खाद्य पदार्थ मागविण्यास आडकाठी नाही. मात्र, मोशी येथील घटनेनंतर वसतिगृहाच्या नियमावलीत ऑनलाइन डिलिव्हरी सेवेबाबतचा नियम समाविष्ट करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.
वसतिगृह व्यवस्थापनाकडून प्रामुख्याने विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नियम केलेले असतात. त्यात वसतिगृहातील वर्तणूक, वसतिगृहात येण्या-जाण्याच्या वेळा, सुविधांचा वापर, पालक-पाहुण्यांच्या भेटीच्या वेळा अशा नियमांचा समावेश असतो. काही वर्षांपूर्वीपर्यंत ऑनलाइन डिलिव्हरी ही सुविधाच उपलब्ध नव्हती. त्यामुळे त्याबाबतचा नियम आतापर्यंत नियमावलीत समाविष्टही करण्याचा विचार झाला नाही. मात्र, आता ही सेवा सुरू झाल्यानंतर आणि त्यातही ऑनलाइन डिलिव्हरी करणाऱ्या डिलिव्हरी बॉयकडून गैरकृत्य घडल्याच्या घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर वसतिगृहे अधिक खबरदारी घेण्याच्या भूमिकेत आहेत.
‘महापालिकेच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत वसतिगृहात अनुपस्थित राहता येत नाही. काही कारणाने संबंधित विद्यार्थ्याला गैरहजर राहावे लागत असल्यास वसतिगृह प्रमुखाची लेखी परवानगी घेणे आवश्यक असते. विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांनी, तसेच पाहुण्यांनी रात्री आठ वाजेपर्यंत वसतिगृहातून बाहेर पडणे आवश्यक आहे. भेटण्यासाठी आलेल्या पाहुण्यांना कोणत्याही कारणास्तव वसतिगृहात राहता येत नाही,’ असे महापालिकेचे समाज कल्याण विभागाचे उपायुक्त नितीन उदास यांनी सांगितले. ‘बदलत्या काळानुसार वसतिगृहात बाहेरील खाद्यपदार्थ मागवण्याची मुभा आहे. त्यासाठी रात्री ११ वाजेपर्यंत परवानगी दिली जाते. विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी आलेल्या व्यक्तींनी त्यांची नोंद करणे बंधनकारक आहे. मुलांच्या वसतिगृहात, तसेच वसतिगृहाच्या परिसरात कोणत्याही महिलांना प्रवेश दिला जात नाही. खाद्यपदार्थ मागविल्यानंतर प्रवेशद्वाराजवळच ते घ्यावे लागतात. रात्री उशिरा बाहेरील कोणत्याही अनोळखी व्यक्तीला वसतिगृहात सोडले जात नाही,’ असेही उदास यांनी स्पष्ट केले.





