पुणे : पुण्यात स्वतंत्र कर्करुग्णालय व्हावे, अशी मागणी खूप वर्षांपासून आहे. ससून रुग्णालयाशेजारील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) भूखंडावर कर्करुग्णालय उभारण्याची चर्चा अनेक वर्षे सुरू होती. परंतु, एमएसआरडीसीने हा भूखंड हा खासगी विकासकाला दिल्याने त्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. आता औंध उरो रुग्णालयातील जागेवर कर्करुग्णालय उभारण्यासाठी ससून रुग्णालय प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून सर्वोपचार रुग्णालयाचा ४०० ते ५०० रुग्णशय्येचे कर्करुग्णालय आणि संशोधन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव आहे. या केंद्रात कर्करोगावरील प्रगत उपचार होतील आणि त्याला संलग्न पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालयही असेल.
कर्करुग्णालयाच्या उभारणीसाठी ६० टक्के निधी केंद्र सरकार देईल आणि ४० टक्के निधी राज्य सरकारचा वैद्यकीय शिक्षण विभाग देईल, असा प्रस्ताव आहे. कर्करुग्णालयात या माध्यमातून पुरेसा निधी मिळवून आधुनिक दर्जाची आरोग्य सुविधा उभारण्याचे नियोजन आहे. सध्या कर्करुग्णांना उपचारासाठी मुंबईला जावे लागते. भविष्यात नवीन सुविधा उभी राहिल्यास पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांवर येथे उपचार होऊ शकतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. वैद्यकीय शिक्षण विभागाने कर्करुग्णालयाच्या उभारणीचा आराखडा तयार करण्यासाठी तज्ज्ञांची पाच सदस्यीय समिती स्थापन केली होती. या समितीने कर्करुग्णालय आणि पदव्युत्तर महाविद्यालयाचा आराखडा तयार केला आहे. हा आराखडा अंतिम टप्प्यात असून, तो जिल्हाधिकाऱ्यांना पुढील आठवड्यात सादर करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकल्पासाठी जमीन देण्याचे आश्वासन दिलेले आहे. औंध उरो रुग्णालयाची एकूण ८५ एकर जागा आहे. त्यातील १० एकर जागेवर कर्करुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
कर्करुग्णालय असे असेल …
• प्रगत कर्करोग उपचार केंद्र
• संलग्न पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय
• ४०० ते ५०० रुग्णशय्या क्षमता
• रुग्ण पुनर्वसन केंद्र
• फिजिओथेरपी केंद्र
• रुग्णाच्या नातेवाइकांसाठी निवास व्यवस्था






