पुणे : मनी लॉड्रिंगच्या प्रकरणात तांत्रिक अटक (डिजिटल अरेस्ट) करून सायबर चोरट्यांनी एका आयटी अभियंत्याची सहा कोटी २९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सेवानिवृत्तीला अवघे काही महिने शिल्लक असताना या अभियंत्याच्या पैशांवर सायबर चोरट्यांनी क्षणार्धात डल्ला मारला. याप्रकरणी पाषाणमधील एका ५९ वर्षीय आयटी अभियंत्याने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार नऊ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पत्नी आणि मुलीसमवेत पाषाण परिसरात राहतात. त्यांच्या मोबाईलवर नऊ नोव्हेंबर रोजी अज्ञात व्यक्तीचा व्हिडिओ कॉल आला. त्याने स्वतःला केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) अधिकारी असल्याचे भासवले. ‘मनी लॉड्रिंग प्रकरणात तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यात तुम्हाला अटक होऊ शकते,’ अशी भीती दाखवली. त्यावर अभियंत्याने ‘मनी लॉड्रिंगमध्ये माझा सहभाग नाही,’ असे सांगितले. परंतु सायबर चोरट्यांनी ‘गुन्ह्यात सहभाग नसेल, तर तुमच्या बँक खात्यातील आर्थिक व्यवहाराची चौकशी करून प्रमाणपत्र घ्यावे लागेल. तुमचे वय पाहता तुम्हाला डिजिटल अटक करीत आहोत. ही बाब कोणाला सांगू नका आणि व्हिडिओ कॉल सुरूच ठेवा,’ असे बजावले. घाबरलेल्या अभियंत्याने हा प्रकार पत्नी आणि मुलीला सांगितला नाही. चोरट्यांनी ‘चौकशीनंतर तुमचे पैसे परत मिळतील’, असे सांगून त्यांना बँक खात्यात सहा कोटी २९ लाख रुपये हस्तांतरित करण्यास भाग पाडले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर चोरट्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचे मोबाईल बंद होते. पुढील तपास पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे करीत आहेत.





