मुंबई : तब्बल दोन दशकांनंतर भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या हत्येचं प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. निमित्त ठरलंय प्रमोद महाजन यांच्या कन्या आणि भाजपाच्या माजी खासदार पूनम महाजन यांनी केलेल्या गंभीर आरोपाचं. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या माजी खासदार पूनम महाजन यांनी गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजनांची हत्या मोठं षडयंत्र होतं ते कधीतरी बाहेर येईलच, असा गौप्यस्फोट पूनम महाजन यांनी केला आहे.
प्रमोद महाजनांच्या हत्येनंतर जवळजवळ दोन दशकांनंतर पूनम महाजन यांनी हा आरोप केला आहे. प्रमोद महाजन यांची हत्या हा एक मोठा कट होता आणि त्याच्या चौकशीसाठी राज्यातील आणि केंद्रातील गृहमंत्र्यांना पत्र लिहणार असून हत्येच्या चौकशीची मागणी करणार असल्याचं पूनम महाजन यांनी म्हटलं आहे. प्रमोद महाजन यांचे सख्खे बंधू प्रविण महाजन यांनी २००६ मध्ये राहत्या घरी त्यांच्यावर तीन गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे आत्मसमर्पन केलं. पण ती गोळी एका माणसाच्या रागाची आणि मत्सराची नव्हती तर त्यामागे मोठं षडयंत्र होतं असं पूनम महाजन यांनी म्हटलं आहे. आता १८ वर्षानंतर देशातील या सर्वात मोठ्या हायप्रोफाइल हत्या प्रकरणात पुन्हा एकदा मोठा द्विस्ट आला आहे.





