ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना तंबाखूजन्य पदार्थ, सिगारेट, गुटखा यांसारख्या पदार्थांच्या व्यसनापासून मुक्त करण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयामार्गत तंबाखू मुक्त शाळा हा उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाचा चांगला परिणाम दिसू लागला असून २०१७ ते २०२४ या कालावधीत ९३६ शाळांना ‘तंबाखू मुक्त’ करण्यात प्रशासनाला यश आले आहे. शाळेतील इयत्ता आठवी ते १० वीच्या विद्यार्थी अनेकदा विविध कारणांमुळे व्यसनांच्या आहारी जात असतात. शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीला बंदी असतानाही परिसरात छुप्या पद्धतीने तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असते. गेल्याकाही वर्षांत ई- सिगारेटच्या व्यसनाचे प्रमाण विद्यार्थ्यांमध्ये वाढले आहे. विद्यार्थी व्यसनांच्या आहारी जाऊ नये यासाठी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्ग ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाने तंबाखू मुक्त शाळा सुरू करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. २०१७ मध्ये ‘सलाम मुंबई’ या संस्थेच्या मदतीने हा उपक्रम सुरू करण्यात आला होता.