वसई : गुन्हे करून पळून जाणार्या आरोपींच्या शोधासाठी महामार्गावर लावण्यात आलेल्या विशेष कॅमेर्यांमुळे एका वर्षात ९० पेक्षा जास्त गुन्हे उघडकीस आले आहेत. यामुळे अशा प्रकारचे अत्याधुनिक कॅमेर्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या शहरात ५ हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मुंबई अहमदाबाद महामार्ग हा गुजरातला जोडणारा महामार्ग आहे. वसई विरार, ठाणे आणि मुंबईतून याच मार्गावरून गुजरात आणि इतर राज्यात जाता येते. त्यामुळे गुन्हेगार देखील याच मार्गावरून जात असतात. त्यामुळे त्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी २०२३ मध्ये येथील शिरसाड नाक्यावर वाहनांचे नंबर टिपणारे अत्याधुनिक कॅमेरे बसविले होते. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या मदतीने हे कॅमेरे लावण्यात आले होते. वाहन कितीही वेगात असले तरी कॅमेर्यातून वाहनांचे नंबर अचूक पणे टिपता येत होते शिरसाड नाका हा मुंबई अहमदाबाद महामार्गावरील मुख्य नाका असून येथूनच सर्व वाहने ये-जा करत असतात. त्यामुळे या ठिकाणाची निवड करण्यात आली होती. या कॅमेर्यातून वसई विरार, मिरा रोड, भाईंदर, मुंबई आणि ठाणे शहरात गुन्हे करून पळून जाणार्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले होते. या कॅमेऱ्याच्या सहाय्याने तब्बल ९० पेक्षा जास्त गुन्हे उघडकीस आणता आले अशी माहिती मांडवी पोलीस ठाण्याचे तत्लाकीन पोलीस निरीक्षक प्रुफुल्ल वाघ यांनी दिली.
५ हजारांहून अधिक कॅमेर्यांचे जाळे गुन्हेगारांना पकडण्यासाठी तसेच संभाव्य गुन्हे टाळावेत यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे महत्वपूर्ण ठरत असतात. मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ‘एक कॅमेरा शहरासाठी’ हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत वसई-विरार शहरातील प्रमुख महत्त्वाच्या ठिकाणी तसेच मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वसई – नालासोपारा – विरार फाटा, कण्हेर फाटा, शिरसाट फाटा, खराडतारा, वज्रेश्वरी रोड या मुख्य नाक्यावर लोकसहभागातून कॅमेरे लावण्यात आले आहेत. अशा प्रकारचे ४ हजार ५९० तसेच सरकारी ठिकाणी १ हजार ३०८ असे एकूण ५ हजार ८९८ सी.सी.टी.व्ही. कॅमेरे लावण्यात आले आहेत, अशी माहिती नुकत्याच झालेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशानत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने कॅमेर्यांची संख्या वाढविणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.