पुणे : शहरातील ३४९ होर्डिंगचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ (संरचनात्मक लेखापरीक्षण) करण्यात आले नसून, ८५ होर्डिंग बेकायदा उभारण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुंबईतील होर्डिंग कोसळण्याच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी ‘स्ट्रक्चरल ऑडिट’विना उभ्या असलेल्या होर्डिंग कंपन्यांना नोटीसा बजावण्यात येणार असून, अनधिकृत होर्डिंगवर कारवाईचा बडगा उगारण्याचा पवित्रा पुणे महापालिकेने घेतला आहे. मुंबईतील घाटकोपर येथे वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळून १४ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. गेल्या महिन्यात वाघोली परिसरातील रस्त्यावरही होर्डिंग कोसळले होते. सुदैवाने त्या वेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही; परंतु ऑक्टोबर २०१८मध्ये पुण्यातील जुना बाजार येथील शाहीर अमर शेख चौकात, तर पिंपरी-चिंचवडमधील किवळे येथे एप्रिल २०२३मध्ये होर्डिंग कोसळून जीवितहानी झाली होती. या घटनांच्या पार्श्वभूमीवर होर्डिंग उभारण्याबाबत नियमावली तयार करण्यात आली. त्यात जमिनीपासून होर्डिंगची उंची निश्चित करण्यात आली; तसेच नियमित कालावधीने या होर्डिंगच्या सांगाड्याचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्याचे बंधन घालण्यात आले होते. मात्र, होर्डिंग कंपन्यांकडून या नियमावलीला हरताळ फासण्यात येत असल्याच्या तक्रारी होत होत्या; याशिवाय शहरात बेकायदा होर्डिंगचा सुळसुळाट कायम होता. मात्र, आता मुंबईच्या दुर्घटनेनंतर महापालिका खडबडून जागी झाली असून, प्रशासनाने पुन्हा एकदा सर्व होर्डिंगची तपासणी सुरू केली आहे.
त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी तातडीने बैठक घेत शहरातील होर्डिंगच्या सुरक्षेचा आढावा घेतला. आगामी पावसाळ्याच्या अनुषंगाने सर्व अधिकृत जाहिरात फलकांचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ अहवाल तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या अहवालांमध्ये त्रुटी असलेल्या होर्डिंग कंपनीवर कारवाई करण्यात येणार आहे. सध्याचा अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि आगामी मान्सून काळात एकही जाहिरात फलक कोसळणार नाही, या अनुषंगाने दक्षता घेण्याची ताकीद सर्व होर्डिंग मालक कंपन्यांना देण्यात आली आहे. शहरात अनधिकृत होर्डिंगवर तातडीने कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असून, ज्या परिमंडळाच्या हद्दीत होर्डिंग आढळतील, तेथील उपायुक्तांनाही कारवाईचा दणका देण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. याबाबत येत्या दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत, असे आकाशचिन्ह विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी सांगितले.
शहरात ३४९ होर्डिंगचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्यात आले नसून, त्यांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत. हडपसर, उरुळी देवाची आणि औंध परिसरात ८५ अनधिकृत होर्डिंग असून, त्यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शहरात होर्डिंग उभारताना नियमावलीचे पालन न करणाऱ्यांविरोधात फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल केले जाणार आहेत.– डॉ. राजेंद्र भोसले, आयुक्त, पुणे महापालिका
शहरातील होर्डिंगबाजी (दृष्टिक्षेपात)
२,५९८ – अधिकृत होर्डिंग
८५ – अनधिकृत होर्डिंग
१,५६४ – कारवाई झालेले होर्डिंग
२,२४९ – स्ट्रक्चरल ऑडिट केलेले होर्डिंग