पुणे : केंद्रीय सीमाशुल्क विभागाने (कस्टम) जप्त केलेला माल स्वस्तात देण्याच्या आमिषाने पुण्यातील व्यापाऱ्याची ६६ कोटी ३३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी नवी मुंबईतील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी अशा पद्धतीने अनेक व्यापाऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी सोहम इम्पेक्स प्रा. लि. चे दशरथ मच्छिंद्र कोकरे, वर्षा दशरथ कोकरे, महेश रामभाऊ बंडगर, सागर रामभाऊ बंडगर (सर्व रा. खारघर, नवी मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मार्केट यार्डातील एका व्यापाऱ्याने फिर्याद दिली आहे. तक्रारदार व्यापाऱ्याचा मार्केट यार्डातील घाऊक बाजारात व्यवसाय आहे. सुपारी, काळी मिरीची निर्यात ते करतात. व्यापाऱ्याच्या ओळखीतील एकाने आरोपी कोकरे यांच्याशी ओळख करुन दिली होती. कोकरे कस्टमने जप्त केलेला माल स्वस्तात मिळवून देतात. या व्यवसायात गुंतवणूक केल्यास मोठा नफा होईल, असे आमिष आरोपींनी दाखविले होते.
आरोपी कोकरे यांची व्यापाऱ्याने भेट घेतली. व्यापाऱ्याला आरोपीने केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाचा बनावट ईमेल दाखविला. व्यापाऱ्याने आरोपींकडे ६६ कोटी ३३ लाख रुपयांची गुंतवणूक केली. गुंतवणूक केल्यानंतर व्यापाऱ्याला कोणताही परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यापाऱ्याने पोलिसांकडे तक्रार दिली. याप्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक रूईकर करत आहेत.