मुंबई : मुंबईतील रस्ते मार्गावरील प्रवाशांची जीवनवाहिनी अशी बेस्ट बसची ओळख बनली आहे. मुंबईच्या पूर्व – पश्चिम उपनगरांना आणि घरांपासून काही अंतरावर बेस्ट सेवा जोडली गेल्याने, स्वस्त आणि वेगवान सेवा असल्याने बेस्टमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मात्र, अनेक प्रवासी तिकिटांचे ५ ते २५ रुपये वाचविण्यासाठी तिकीट काढत नाही. त्यामुळे त्यांना ६६ रुपये ते २०० रुपयांपर्यंत दंड भरावा लागला आहे. गेल्या तीन महिन्यांत बेस्टमधील ६४ हजारांहून अधिक विनातिकीट प्रवाशांना पकडून ४० लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात सध्या २ हजार ९१६ बस असून यामधून दररोज ३३ ते ३४ लाख प्रवासी प्रवास करतात. बस प्रवाशांची संख्या वाढत असताना, या गर्दीतून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असून उत्पन्नात घट होत असल्याचे बेस्ट उपक्रमाच्या निदर्शनास आले. त्यामुळे जानेवारी २०२४ पासून बेस्ट उपक्रमाच्या बसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरूद्ध बेस्ट उपक्रमाने विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. याअंतर्गत बेस्ट उपक्रमाने मुंबईच्या गर्दीच्या बसस्थानकांंवर अतिरिक्त तिकीट निरीक्षकांची नेमणूक केली. या पथकामध्ये एकूण ३८२ निरीक्षकांची तिकीट तपासणीसाठी मुंबईच्या वेगवेगळ्या गर्दीच्या ठिकाणी नेमणूक केली. त्याद्वारे जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत ६४ हजार ५९४ विनातिकीट प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून ३९ लाख ५१ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
बेस्टचे वातानुकूलित प्रवासाचे किमान तिकीट दर ६ रुपये ते कमाल २५ रुपये आहे. तर, विनावातानुकूलित बसचे किमान तिकीट दर ५ रुपये आणि कमाल २० रुपये आहे. मात्र तरीही अनेक प्रवासी वाहक नसल्याचे पाहून, बिनधास्तपणे विनातिकीट प्रवास करतात. अशा प्रवाशांना रोखण्यासाठी बेस्ट उपक्रमाने तिकीट तपासणी पथक तयार केली. सध्या बेस्ट उपक्रमाकडून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून देय असलेले प्रवास भाडे, अधिक प्रवासी भाड्याच्या रकमेच्या दहापट एवढी रक्कम दंड म्हणून आकारण्यात येते. दंड भरण्याचे नाकारल्यास मुंबई महानगरपालिका अधिनियमानुसार कायदेशीर कारवाई केली जाते, अशी माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली.
महिना – विनातिकीट प्रवासी – दंडवसुली
जानेवारी – २५,०७९ – १५.४० लाख रुपये
फेब्रुवारी – २१,२४७ – १२.९८ लाख रुपये
मार्च – १८,२६८ – ११.१३ लाख रुपये