नवी मुंबई : महानगर पालिकेच्या परिवहन उपक्रमातील सर्व प्रकारच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय नवी मुंबई मनपाकडून मंजूर करण्यात आला आहे. नवी मुंबईतील महिलांना परिवहन बसेस मधून प्रवास करताना सवलत देण्यात यावी अशी मागणी महिला प्रवासी, सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनिधींकडून वारंवार करण्यात येत होती. वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्र येथे आयोजित महाराष्ट्र भवन भूमी पूजन कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नवी मुंबईतील महिलांना मनपाच्या परिवहन बसमधून प्रवास करताना ५० टक्के सवलत मिळण्याबाबत नवी मुंबई मनपा आयुक्तांना सूचना देण्यात आल्या होत्या. या सूचनेनुसार महाराष्ट्र शासनाच्या “महिला सशक्तीकरण” या अभियानाच्या संकल्पनेतून व महिला सन्मानार्थ तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे नवी मुंबई मनपा परिवहन विभागातर्फे सांगण्यात आले आहे. या संदर्भातील प्रस्ताव नवी मुंबई परिवहन विभागाकडून नवी मुंबई मनपाकडे मांडण्यात आला होता. त्याला महानगर पालिका अधिनियम कलम ३४३(१) अन्वये नवी मुंबई मनपा आयुक्तांकडून मंजूरी देण्यात आली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमामार्फत नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात व हद्दीबाहेर मुंबई, बोरिवली, ठाणे, डोंबिवली, कल्याण, दहिसर, अंबरनाथ, बदलापूर, पनवेल, उलवे नोड, खोपोली, कर्जत व वाशिवली / रसायनी या विभागात ४० सर्वसाधारण व ३७ वातानुकूलीत अशा एकूण ७७ विविध बसमार्गांवर प्रवासी सेवा देण्यात येत आहे. त्यानुसार दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ पासून नवी मुंबई महानगर पालिका परिवहन उपक्रमांतर्गत चालणाऱ्या सर्व प्रकारच्या बसेस मधून प्रवास करताना महिलांना तिकीट दरांत ५० टक्के सवलत मिळणार आहे. तसेच महिलांना देण्यात येणारे ५० टक्क्यांचे सवलत तिकीट ईटीएम माशीनमध्ये देखील उपलब्ध असणार असल्याची माहिती परिवहन विभागाकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आली आहे. यामुळे येत्या काळात नवी मुंबईच्या परिवहन उपक्रमांतर्गत चालणाऱ्या बसेसमधून प्रवास करताना महिलांचा प्रवास सुखकर होणार असल्याचे महिलांकडून म्हटले जात असून महिला प्रवाशांच्या टक्का वाढण्याची शक्यता परिवहन विभागाकडून वर्तवली जात आहे. सद्यस्थितीत नमुंमपा परिवहन उपक्रमाच्या बसेसमधून दैनंदिन दोन लाखाहून अधिक प्रवाशी प्रवास करीत असून त्यामध्ये साधारणतः ४०% महिला प्रवासी प्रवास करतात. नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या बसेसमधून दैनंदिन प्रवास करणाऱ्या अंदाजित ८० हजार महिला प्रवाशांना याचा लाभ होणार आहे. तरी महिलांनी या प्रवास सवलतीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केलेले आहे.