पुणे :- मुंबई जुन्या महामार्गावरून बेकायदेशीर गांजा वाहतूक करणाऱ्या दोघांना लोणावळा ग्रामीण पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. टेम्पोमधून वीस किलो गांजा लोणावळा ग्रामीण पोलिसांनी जप्त केला आहे. अशोक भुजंग चव्हाण आणि शंकर भगवान साळुंखे यांना लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून लोणावळा ग्रामीणचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली संकल्प नशा मुक्ती अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर मुंबईहून पुण्याच्या दिशेने टेम्पोतुन गांजा वाहतूक करणार असल्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पुणे- मुंबई महामार्गावरील वरसोली या ठिकाणी सापळा रचून टेम्पो पकडण्यात आला. टेम्पोमधील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन टेम्पोची झडती घेतली, टेम्पोमध्ये वीस किलो गांजा आढळला आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमका हा गांजा कुठे घेऊन जाण्यात येत होता? कोणाला दिला जाणार होता याविषयी अधिक तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण अंकित गोयल, नितेश गीते, सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, देविदास करंडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक युवराज बनसोडे, पोलीस कर्मचारी गणेश होळकर, केतन तळपे, राहुल खैरे, प्रशांत तुरे यांच्या टीमने केली आहे.