मुंबई : मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईकरांचे रक्षण करणाऱ्या मुंबई पोलिसांची घरेच आता सुरक्षित नाहीयेत. मुंबईच्या माहीम परिसरात चोरट्याने पोलिसांच्या घरांवर डल्ला मारला आहे. एक दोन नव्हे तर तब्बल १३ पोलिसांच्या घरात चोरट्याने एकाच वेळी चोरी केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हा सगळा प्रकार तिथल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. त्यामुळे गुन्हेगारांना आता मुंबई पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही असा प्रश्न विचारला जात आहे. माहीम पोलीस कॉलनीत एकाच वेळी १३ पोलिसांच्या घरात चोरी झाल्याचं समोर आलं आहे. चोरट्याने माहीम येथे १३ पोलीस अधिकाऱ्यांच्या घरात घुसून मौल्यवान वस्तू चोरल्या याच वसाहतीतील सोसायटी कार्यालय आणि प्ले ग्रुपलाही चोरट्याने लक्ष्य केलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा आणि १७ ऑगस्टच्या पहाटे या चोरीच्या घटना घडल्या आहेत. माहीम पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, “१७ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० च्या सुमारास पोलीस क्वार्टरची देखरेख करण्यासाठी नेमलेले हवालदार राजाराम मोहिते हे चोरी झाल्याची माहिती मिळताच तेथे पोहोचले. चोरट्याने १३ पोलिस अधिकाऱ्यांची घरे फोडल्याचे मोहिते यांना समजले. बहुतेक रहिवासी रात्रीच्या वेळी घरात नव्हते.”
पोलीस अधिकाऱ्यांच्या दाराचे मध्यरात्री कडी-कोयंडा तोडून चोरट्याने घरात प्रवेश केला होता. पोलिसांच्या घरातून रोकड आणि मौल्यवान वस्तूंची तसेच देवाच्या चांदीच्या मूर्तीची चोरी करण्यात आली आहे. चोरट्याने रात्रपाळीवर असलेले पोलीस, सुट्टीनिमित्त गावी गेलेल्या पोलिसांची घरे तसेच निवृत्त पोलिसांच्या बंद घरांना लक्ष्य केलं. महत्त्वाची बाब म्हणजे चोरटा चोरी करणाऱ्या घराच्या शेजारी असलेल्या घरांच्या कड्या लावून घेत होता. जेणेकरुन आवाज जरी गेला तरी कोणालाही बाहेर येता येणार नाही. याप्रकरणी माहिम पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू केला आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या घरांसह चोरट्याने इमारतीतील प्ले ग्रुप आणि सोसायटीचे कार्यालयही लक्ष्य केले. “आतापर्यंत केलेल्या तपासात मौल्यवान वस्तू आणि रोकड चोरीला गेली आहे. आम्हाला संशय आहे की चोरीच्या वस्तूंची एकूण किंमत जास्त असू शकते, कारण आम्ही नुकसानीचे पूर्ण मूल्यांकन करण्यासाठी रहिवाशांच्या परत येण्याची वाट पाहत आहोत,” अशीही माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, माहीम पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीचा शोध सुरू केला आहे. “आम्ही परिसराच्या सीसीटीव्ही फुटेज तपासत आहोत आणि अधिक माहितीसाठी परिसरातील गुन्हेगारांच्या नोंदी तपासत आहोत,” असे पोलिसांनी सांगितले.