मुंबई : आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत ‘डायल १०८ ही रूग्णवाहिका सेवा अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या या सेवेने राज्यातील नागरिकांची आरोग्य सेवा करीत तब्बल १० वर्ष पूर्ण केले आहे. या १० वर्षाच्या कालावधीत १०८ रूग्ण्वाहिकेची सेवा रूग्णांना जीवनदान देणारी ठरली आहे. अशा या संजीवनी देणाऱ्या रूग्णवाहिका सेवेने राज्यात १ कोटी ३ हजार ४४६ रूग्णांची विनामूल्य आरोग्य सेवा केली आहे. कुणी आजारी असेल, अपघात झाला असेल किंवा वैद्यकीय सेवेची मदत असेल तर १०८ रूग्णवाहिका सेवेसाठी तत्पर असते. आपत्कालीन आरोग्य सेवांसाठी ‘एक-शून्य-आठ’ हा विनामूल्य दूरध्वनी क्रमांक आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान, सार्वजनिक आरोग्य विभाग व भारत विकास ग्रुपच्या (बीव्हीजी इंडिया) संयुक्त विद्यमाने ही सेवा अव्याहतपणे राज्यात ठिकठिकाणी चालविण्यात येत आहे. महाराष्ट्रात या सेवेची सुरूवात जानेवारी २०१४ मध्ये झाली. राज्यात सध्या ९३७ रूग्णवाहिका असून सर्व रूग्णवाहिकेत पल्स ऑक्सिमीटर, मेडीकल ऑक्सिजन यंत्रणा सज्ज आहे. ही देशातील अविरत २४ तास डॉक्टर व अत्यावश्यक वैद्यकीय सुविधेसह असणारी एकमेव यंत्रणा आहे. राज्यात १०८ रूग्णवाहिकेमध्ये ४० हजार २१३ प्रसुती करण्यात येऊन त्यांना सुखरूप सोडण्यात आले आहे. तसेच ४ हजार ३४ रूग्णांना कृत्रिम श्वासोच्छवास (व्हेंटीलेटर) ची सुविधा देण्यात येऊन त्यांचे प्राण वाचविण्यात आले आहे.
राज्यात कोणत्याही ठिकाणावरून मोबाईल अथवा दूरध्वनीवरून 108 क्रमांक डायल करताच वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत रूग्णांना विनामूल्य आणि वेळेत रूग्णवाहिका सेवा देण्यात येते. सेवा सुरू झाली तेव्हापासून, जून २०२४ पर्यंत अपघाती घटनांमध्ये रूग्णवाहिकेमधून ५ लाख २२ हजार ६८२ रूग्णांना उपचारासाठी रूग्णालयात पोहचविण्यात आले आहे. तसेच आगीच्या घटनांमध्ये २९ हजार २५३, हृदयरोगमध्ये ७५ हजार ५९३, उंचावरून पडून जखमी झालेल्या १ लाख ५८ हजार ६८४, विषबाधा प्रकरणी २ लाख ३२ हजार ४२६, प्रसुतीवेळी १६ लाख ५६ हजार ९४, शॉक किंवा वीज पडून जखमी या घटनांमध्ये ६ हजार ९४९ रूग्णांना सेवा देण्यात आली आहे. अशा प्रकारे राज्यात १ कोटी ३ हजार ४४६ रूग्णांना आरोग्य सेवा १०८ च्या माध्यमातून मिळाली आहे. महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा या नावाने असलेल्या १०८ ही रूग्णवाहिका सेवा सुरू आहे. याव्यतिरिक्त राज्यात नाशिक येथील महाकुंभमेळा कालावधीत १ लाख ७ हजार २०० रूग्णांना सेवा दिली. महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या पंढरपूरच्या वारीमध्ये २ लाख ८९ हजार ६४६ आणि गणपती उत्सवात ४ हजार ६८४ रूग्णांना १०८ ने सेवा दिली आहे. या सेवेमध्ये सुधारणा करण्यासाठी किंवा सेवेच्या समाधानाबाबत नागरिकांचा प्रतिसाद (फिडबॅक) देखील घेण्यात येतो. राज्यात सेवेबद्दल ६ लाख ७४ हजार ५४२ प्रतिसाद प्राप्त झाले आहे. यामध्ये ८१ हजार १५५ एकदम उत्तम, ५ लाख ७० हजार ५९४ उत्तम आणि २२ हजार ७३२ चांगला प्रकारातील आहे. राज्यात १०८ रूग्ण्वाहिका सेवा संजीवनी आहे. गरीब रुग्णांना या सेवेमुळे वेळेत उपचार मिळण्यासाठी मोलाची मदत झाली आहे. त्यामुळे त्यांना संजीवनीच मिळाली आहे. ही सेवा कोरोना काळात जीवनदायी ठरली आहे.