नवी मुंबई : सट्टा बाजार अर्थात शेअर मार्केट मध्ये जादा आमिष दाखवून वाशीतील एका व्यक्तीची तब्बल एक कोटी ३७ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून सायबर शाखा आरोपीचा शोध घेत आहे.
अजिंक्य भंवर , आयर्न गुप्तता, ग्लोरिया, स्टॊक मार्केट समुद प्रशासक, सेवा केंद्र (कस्टमर सर्व्हिस) असे यातील आरोपींची नावे आहेत तर शंकर वेंकटाचलम,असे फिर्यादीचे नाव आहे. २१ जुलै रोजी शंकर यांच्या मोबाईल वर शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करा गुंतवणुकीत मोठ्या प्रमाणात फायदा होईल असे आमिष फोन करणाऱ्या अजिंक्य भंवर नामक व्यक्तीने दाखवले. त्यामुळे सुरवातीला थोडी थोडी गुंतवणूक शंकर यांनी केली. त्याला मोठ्या प्रमाणात परतवा त्यांना मिळाला त्यामुळे त्यांनी गुंतवणूक रकमेत वाढ केली मात्र काही दिवसांनी त्यांना परतावा कमी कमी होत गेला. त्यामुळे गुंतवणूक रकमेत वाढ करा चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करतो असे आश्वासन आरोपींनी दाखवले.
सुरुवातीला गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळाला असल्याने शंकर यांनी गुंतवणूक रकमेत हळू हळू वाढ केली. अशा प्रकारे त्यांनी एकूण १ कोटी ३७ लाख ५० हजार रुपयांची गुंतवणूक केली. ही गुंतवणूक करताना आरोपी सांगेल त्या त्या विविध बँक खात्यात ही गुंतवणूक केली. हा प्रकार २१ जुलै ते १८ ऑक्टोबर दरम्यान झाला. त्या दरम्यान आरोपींनी दिलेल्या कस्टमर सेवा केंद्राशी संपर्क साधण्याचा आला. मात्र गुंतवणूक वाढवण्याचा सल्ला देण्यात आला. कालांतराने गुंतवणूक करणे बंद केले. मात्र हे कळताच आरोपींनी संपर्क बंद केला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर शंकर यांनी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीची शहानिशा करून एक नोव्हेंबरला गुन्हा दाखल करण्यात आला. अशी माहिती सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम यांनी दिली.