मुंबई : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम इशा डे सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. इशा डेनं दोन दिवसांपूर्वी तिच्या ग्रहमाखाचे फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. त्याचबरोबर तिच्या मेहेंदीचे फोटोही व्हायरल झालेले. मात्र, इशा कोणासोबत लग्नबंधनात अडकणार याकडे चाहत्यांचं लक्ष होतं. मात्र आता इशा डेचा होणारा नवरा कोण आहे, हे समोर आलं आहे. वनिता खरातनं शेअर केलेल्या पोस्टवरून इशाचा नवरा कोण आहे, गुपित उलगडलं आहे.
इशा डेचं लग्न ‘Zostel Panchgani’ येथे होत आहे. इशाच्या लग्नासाठी तिची हास्यजत्रेतील सह-कलाकार मंडळी पोहोचली आहेत. वनिता खरात, प्रियदर्शिनी इंदलकर आणि रोहित माने इशाच्या लग्नासाठी पोहोचले आहेत. वनिता खरातनं इन्स्टाग्रामवर तिघांचा फोटो शेअर केलाय. त्यामध्ये इशा आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याला टॅग केलं आहे. हे फोटो शेअर करत अभिनेत्रीनं ‘मज्जा आली पाहिजे’ असं लिहिलं आहे. त्याचबरोबर अभिषेकचा मित्र आदिनाथ पाटकरनेही इशा अभिषेकसोबत उभी असलेला फोटो शेअर केला असून हा फोटो शेअर करत, ‘चला तुमचं लग्न करूया’ असं कॅप्शन लिहिलं आहे. वनिता खरातनं इन्स्टाग्रामवर इशा डेसोबत लेखक अभिषेक खणकरलाही टॅग केलं आहे. त्यामुळे इशा डे, लेखक अभिषेक खणकरसोबत लग्नबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे. अभिषेक, लेखक तर आहेच पण त्याचबरोबर तो गीतकारसुद्धा आहे. अभिषेकला त्याच्या ‘अनन्या’ सिनेमातील ‘ढगा आड़ या’ या गाण्यासाठी ६० आणि ६१ वा राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा २०२५ चा उत्कृष्ट गीताचा पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर तो झी मराठीवरील ‘खुलत कळी खुलेना’ या मालिकेच्या शीर्षकाचा गीतकारही आहे. यासाठी त्याला झी मराठीचा ‘उत्कृष्ट शीर्षक गीता’चा पुरस्कारही मिळालेला आहे. इतकंच नव्हे तर अभिषेकनं ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेचंही शीर्षक गीत लिहिलेलं आहे. त्यामुळे, आता इशा डे कधी लग्नबंधनात अडकणार याकडे चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.






