मुंबई : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालयात आता ह्रदयविकाराच्या रुग्णांना ह्रदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमधील गाठ विरघळविणारे औषध व इंजिक्शेन मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जागतिक ह्रदयविकार दिनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येत आहे. ह्रदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांसाठी पहिले काही तास हे अत्यंत मोलाचे असतात. या काळात योग्य उपचार मिळाल्यास रुग्णाचा जीव वाचू शकतो. यासाठी रुग्णालयात कॅथलॅब तसेच ह्रदयशस्त्रक्रियेची व्यवस्था असणे आवश्यक असते. ग्रामीण भागात अशी खार्चिक व्यवस्था फारशी नसल्याच्या पार्श्वभूमीवर ह्रदयविकाचा झटका आलेल्या थ्रॉम्बोसिसच्या उपचारात म्हणजे रक्तवाहिन्यातील गुठळी विरघळविणारे प्रभावी औषध ‘टिनेक्टिप्लेज’ उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामुळे रुग्णाला पुढील उपचारासाठी पुरेसा वेळ मिळू शकणार आहे. खाजगी रुग्णालयात या उपचाराचा खर्च औषध व इंजेक्शनसह किमान ५० ते ७० हजार रुपये येत असून आरोग्य विभागाच्या रुग्णालयात हे औषध मोफत देण्यात येणार असल्याचे आरोग्य संचालक डॉ स्वप्निल लाळे यांनी सांगितले.
आता जागतिक ह्रदयविकार दिनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये म्हणजे जेथे अतिदक्षता विभाग आहे तसेच एमडी मेडिसीन वा ह्रदयशल्यविशारद आहे अशा रुग्णालयात ह्रदयविकाराचा त्रास असलेल्या रुग्णांच्या रक्तवाहिनीतील गाठ विरघळविणारे टिनेक्टिप्लेज हे औषध देणार आहोत. त्यामुळे अँजिओप्लास्टी वा बायपास उपचार करण्यासाठी रुग्णाला अवधी मिळणार आहे. त्याचप्रमाणे आरोग्य विभागाच्या रुग्णालयांध्ये २३ ठिकाणी कॅथलॅब बसविण्यात येणार असून त्यामुळे ग्रामीण भागातील ह्रदयविकाराच्या रुग्णांना अधिक जवळ अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टीची सुविधा उपलब्ध होईल असे आरोग्य संचालक डॉ लाळे यांनी सांगितले.