मुंबई : आपल्या देशामध्ये सर्वसामान्यांची ताकद काय असते, ते दाखवून दिले आहे. सत्ताधारी कितीही मस्तवाल झाले तरी एका बोटाने आपण त्यांना हरवू शकतो, त्यांना रोखू शकतो, हे देशातील जनेतेने जगाला दाखवले आहे, अशी बोचरी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, की ‘इंडिया’ आघाडीने सत्ता स्थापनेसाठी दावा केलाच पाहिजे. याबाबत दिल्लीत बैठक आहे. सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असेल, याबाबत या बैठकीत चर्चा होईल. आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय, इंडिया आघाडी स्थापन केली तेव्हापासून सांगतोय की, आमच्यापैकी कुणीही पंतप्रधानपदासाठी इच्छुक नाही. देशातील लोकशाही, संविधान वाचवले पाहिजे, हुकूमशाहीपासून वाचविले पाहिजे, ही आमची एकत्र येण्यामागची भावना होती. हीच भावना अजूनही कायम आहे.
इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवला जाईल. आम्ही सोबत राहू, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ‘एनडीएक’डे बहुमत आहे, असे दाखवले जातेय. मात्र बिहारमध्ये मतमोजणी उशिराने सुरू झाली. या जुलूम जबरदस्तीला सगळे कंटाळले आहेत. या विरोधात सर्व पक्ष एकत्र येतील आणि पुन्हा या जुलूमजबरदस्तीचे सरकार येऊ देणार नाही, याची खात्री आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.