पालघर : जल, जंगल, जमिनीचे रक्षण करत पर्यावरण जपणाऱ्या आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या सहाय्याने सर्वांनी काम करणे गरजेचे आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी सुरू केलेल्या शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी क्रांतीवीर बिरसा मुंडा यांना नमन करून जागतिक आदिवासी दिनाच्या सर्व आदिवासी बांधवाना शुभेच्छा दिल्या. पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील राजीव गांधी मैदान येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी विकास विभागामार्फत राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.
आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, श्रीमती कुमुद गावित, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, खा. राजेंद्र गावित, आ.शांताराम मोरे, आ.श्रीनिवास वनगा, आदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिव प्रदीप कुमार व्यास हे व्यासपीठावर उपस्थित होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, शासनाने २५० आदिवासी आश्रम शाळांचा कायापालट केला आहे. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षणक्रमास प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परिक्षेचे मार्गदर्शन करण्यासाठी योजना राबविण्यात येत आहे. १०० विद्यार्थ्यांना पीचडीसाठी छात्रवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या गावात आदिवासींची लोकसंख्या पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आहे. तिथे १७ संवर्गातील भरती ही स्थानिकांमधूनच करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले. शैक्षणिक आणि वैद्यकीय सुविधा आदिवासी पाड्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी रस्त्यांची उभारणी करण्यात येत आहे. समाजातील प्रत्येक घटकाला मान, सन्मान आणि विकासाची संधी देण्याचे काम प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या प्रेरणेने होत आहे. तसेच ‘मेरी माटी मेरा देश’ या उपक्रमांचा शुभारंभही झाला आहे. भारताच्या स्वतंत्र चळवळीत आदिवासी बांधवांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगून त्यांनी शहीद आदिवासींना नमन केले.