मुंबई : चांदणी चौक पुलाच्या उद्घाटनाच्या दिवशी पुण्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्यात झालेली भेट कौटुंबिक होती त्यावर भाष्य करण्यात अर्थ नाही. मात्र याचा राजकारणावरती आम्ही कोणताही परिणाम होऊ देणार नाही. महाविकास आघाडी मजबुतीने उभी आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्र आहेत आणि राहतील. महाविकास आघाडीतही राहतील आणि इंडिया आघाडीमध्ये देखील राहतील. आम्ही एकत्र आहोत आणि एकत्र राहणार आहोत, असं संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले. अजित पवार यांनी भाजपसोबत जात शिंदे सराकरमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली. अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले. या दोन गटांमध्ये कडवा संघर्ष पाहायला मिळेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र या सगळ्याच्या विरूद्ध परिस्थिती पाहायला मिळती आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्या वारंवार भेटी होत आहेत. अलीकडे चांदणी चौक पुलाच्या उद्घाटनाच्या दिवशी पुण्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्यात भेट झाली. उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या घरी ही भेट झाली. ही कौटुंबिक आणि वैयक्तिक भेट असल्याचे अजित पवार आणि शरद पवार या दोघांनीही सांगितले. मात्र या भेटीनंतर महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत संभ्रम निर्माण होऊ लागला. या पार्श्वभूमीवर त्यावर संजय राऊतांनी सदररील भाष्य केले आहे.शरद पवार आणि अजित पवार यांच्यात वरचेवर होणाऱ्या या भेटी पाहता महाविकास आघाडीत संभ्रमाची परिस्थिती निर्माण होत आहे. अशा स्थितीमुळे महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य करून पडदा टाकला आहे.
संजय राऊत म्हणाले की, काही कौटुंबिक अडचणी आणि कौटुंबिक कामासाठी अजित पवार आणि शरद पवार भेटले अशी माझी माहिती आहे. पवारांचे कुटुंब मोठं आहे .यावर मी अधिक बोलायला नको. पण शरद पवार हे महाविकास आघाडीचे महत्वाचे नेते आहेत. आमचे मार्गदर्शक आहेत. आमचे नेते आहेत. काल रात्री त्यांची आणि माझी फोनवरून चर्चा झाली. शरद पवार सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. ते सोलापुरात होते तिथे त्यांचे स्वागत झालं. आज ते संभाजीनगरमध्ये ते पक्ष बांधणीसाठी आहेत, असंही राऊतांनी सांगितलं आहे. पंतप्रधान मोदी यांच्याशी आमचं काही वैयक्तिक वैर नाही. पण ते ज्या प्रकारे बिनबुडाचं, बदल्याचं राजकारण करत आहेत. त्यामुळे विरोधकांना एकत्र यावं लागलं आहे. २०२४ च्या निवडणुका आम्ही जिंकू. इंडियाचं सरकार येईल. पुढचा स्वातंत्र्य दिनाचा लाल किल्ल्यावरचा सोहळा नरेंद्र मोदीजी गुजरात मध्ये आपल्या घरी बसून पाहतील किंवा माजी पंतप्रधान म्हणून समोर बसून पाहतील. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.