मुंबई : मुंबईच्या मालाड पूर्व परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पठाणवाडी परिसरातील एका बंद पाळणाघरातून काही दिवसांपासून दुर्गंधी येत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये संशय निर्माण झाला होता. पाळणाघराच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांना सतत दुर्गंधी जाणवत असल्याने त्यांनी याबाबत पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पाळणाघराचे बंद असलेले दार उघडताच आतून दुर्गंधी अधिक तीव्र झाली. त्यानंतर पोलिसांनी आत तपासणी केली असता, पाळणाघरामध्ये एक मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा मृतदेह नेमका कोणाचा आहे? तो पाळणाघरात कसा आला? तसेच या घटनेमागील नेमके कारण काय आहे, याचा तपास कुरार पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका मुलीने आपल्या वडिलांचे पार्थिव तब्बल चार वर्षे जतन केल्याचा दावा करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जून २०२२ मध्ये संबंधित महिलेच्या वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. मात्र, वडिलांवरील प्रेमापोटी आणि त्यांना कायम पाहता यावे यासाठी तिने परदेशातील एका कंपनीच्या मदतीने त्यांचे पार्थिव जतन करून ठेवले असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी संबंधित मुलीने कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांची नियुक्ती केल्याची माहितीही समोर आली आहे. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून मृतदेहाची ओळख, पार्थिव जतन करण्याची प्रक्रिया, तसेच यामागील परिस्थिती याबाबत माहिती गोळा केली जात आहे. या घटनेमुळे मालाड परिसरात मोठी चर्चा सुरू असून पोलिसांच्या तपासानंतरच या प्रकरणातील संपूर्ण सत्य समोर येणार आहे.





