वृत्तसंस्था : तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात वेगाने प्रगती करत असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेला (AI) आता अमेरिकेत अधिकृतपणे नवी ओळख मिळणार आहे. अमेरिकन प्रशासनाच्या पातळीवर कृत्रिम बुद्धिमत्ता या संज्ञेऐवजी आता ‘सुपर इंटेलिजन्स’ (SI) ही संज्ञा वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर या बदलाची घोषणा केली. राष्ट्राध्यक्षांनी स्वाक्षरी केलेल्या विशेष कार्यकारी आदेशानुसार अमेरिकन प्रशासकीय व्यवहारांमध्ये ‘सुपर इंटेलिजन्स’ या नव्या संज्ञेचा वापर केला जाणार आहे. पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी सांगितले की, जगातील सर्वात बुद्धिमान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या नेतृत्वाने एकत्र येऊन ही नवी संज्ञा निश्चित केली आहे. या निर्णयामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या क्षमतांना अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
या ऐतिहासिक कार्यकारी आदेशाला जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक दिग्गज कंपन्यांच्या प्रमुखांनीही पाठिंबा दिला आहे. गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई, मेटाचे प्रमुख मार्क झुकरबर्ग, उद्योगपती एलन मस्क, एनव्हिडियाचे प्रमुख जेन्सन हुआंग, ओपनएआयचे ग्रेग ब्रॉकमन आणि ॲन्थ्रॉपिकच्या दारिया अमोदेई यांच्यासह तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींनी या बदलाला मान्यता दिली आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, सुपर इंटेलिजन्स म्हणजे अशी प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता जी मानवी विचारशक्ती, विश्लेषण क्षमता आणि समस्या सोडवण्याच्या क्षमतेच्या पुढे जाऊ शकते. ही संकल्पना केवळ मानवी बुद्धिमत्तेची नक्कल करण्यापुरती मर्यादित नसून, भविष्यातील तंत्रज्ञानाच्या अमर्याद शक्यतांचे प्रतीक मानली जात आहे. या कार्यकारी आदेशाद्वारे अमेरिकेच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाला ‘सुपर इंटेलिजन्स’ची अधिकृत राष्ट्रीय व्याख्या निश्चित करण्यासाठी ६० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या निर्णयामुळे भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासासाठी नवीन धोरणे आणि नियम तयार होण्याची शक्यता आहे. दरम्यान, जगभरात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वेगवान विकासामुळे सुरक्षितता, नियंत्रण आणि संभाव्य धोके याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक देशांकडून या तंत्रज्ञानाच्या वापरासाठी स्पष्ट नियम आणि सुरक्षा उपायांची मागणी होत असतानाच अमेरिकेने हा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते, प्रत्यक्षात पूर्ण क्षमतेची सुपर इंटेलिजन्स प्रणाली विकसित होणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे या नव्या संज्ञेच्या घोषणेनंतरही तंत्रज्ञानाच्या भविष्यातील वाटचालीकडे जगाचे लक्ष लागले आहे.






