मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंनी अखेर एकत्र येण्याचा निर्णय जाहीर केला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात बीएमसी निवडणूक साठी युतीची घोषणा करण्यात आली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मुंबईतील वरळी येथील ब्लू सी हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेत युतीची औपचारिक घोषणा केली. यावेळी उद्धव आणि राज यांच्यासह संजय राऊतही व्यासपीठावर होते. तिघांनीही उपस्थितांशी संवाद साधला. मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि आमचाच होणार, असं राज ठाकरेंनी ठणकावून सांगितलं.
“जाहीर सभा सुरु झाल्या की बाकी बोलायचं ते बोलू. पण माझी एक मुलाखत झाली होती, त्याची मुद्दाम आठवणूक करुन देऊ इच्छितो की, त्यात मी म्हटलं होतं की कुठल्याही भांडण किंवा वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. त्या वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली.” असं राज ठाकरे म्हणाले. “कोण किती जागा लढवणार, आकडा काय, हे नाही सांगणार. महाराष्ट्रात लहान मुलं पळवणाऱ्या टोळ्या आहेत. त्यात दोन टोळ्या जास्त झाल्यात, ते राजकीय पक्षातील मुलं पळवतात. ज्याची अनेक दिवस वाट पाहिली जात होती, शिवसेना आणि मनसेची युती झाली हे आम्ही जाहीर करत आहोत.” अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली.







