मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेले यश पाहता, मुंबई महापालिका निवडणुका नववर्षाच्या सुरुवातीला होण्याची शक्यता आहे. भाजपकडून तयारीसाठी बैठकांचे सत्र सुरू झाले आहेत. महापालिका निवडणुकीत महायुतीला १५० जागा मिळवण्याचे उद्दिष्ट भाजपने ठेवले आहे. तर शिंदे यांच्या शिवसेनेने मात्र मंत्रिमंडळाच्या घोषणेनंतरच महापालिका निवडणुकांची रणनीती आखणार असल्याचे स्पष्ट केले आहे. शिवसेना (उबाठा) पक्षानेही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र नवीन सरकारच्या स्थापनेनंतरच महाविकास आघाडीदेखील निवडणुकांची रणनीती ठरवणार आहे. मुंबई महापालिका निवडणुका २०१७ मध्ये पार पडल्या. त्यानंतर मार्च २०२२मध्ये महापालिकेतील नगरसेवकांची मुदत संपली. त्यानंतर महापालिकेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली. फेब्रुवारी २०२२मध्ये महापालिका निवडणुका होणे अपेक्षित होते. मात्र, प्रशासकीय राजवट कायम राहिली. मागील दोन अर्थसंकल्प प्रशासकांनीच सादर केले.
वॉर्डस्तरावर नगरसेवक नसल्याने कामांना गती मिळत नाही, अशी तक्रार करत महापालिका निवडणुका घेण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून सातत्याने होत आहे. मात्र, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला मिळालेले यश पाहता, पुढील वर्षात निवडणुका होण्याची शक्यता आहे. सध्या महायुतीला पोषक वातावरण असल्याने, महायुतीतील भाजपने महापालिका निवडणुकांसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. महायुतीला गेल्या दोन निवडणुकांमध्ये मिळालेले यश पाहता, मुंबई महापालिका निवडणुकीत १५० पर्यंत जागा मिळवण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुंबई भाजपचे उपाध्यक्ष आणि महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी स्पष्ट केले. भाजपच्या माजी नगरसेवकांची विविध कामे जास्तीत जास्त मुंबईकरांपर्यंत पोहोचवण्यासाठीही प्रयत्न केले जाणार असून त्यासाठीही नियोजन होत आहे. दुसरीकडे, शिवसेनेने मात्र अद्याप महापालिकेसाठी रणनीती जाहीर केलेली नाही. ‘नवीन सरकार, मंत्रिमंडळ अशी राज्याची घडी बसल्यानंतरच, महापालिका निवडणुकांच्या रणनीतीची विचार केला जाईल,’ असे शिवसेनेच्या माजी नगरसेविका आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी स्पष्ट केले.