पुणे : ‘जे लोक सत्तेच्या लोभामुळे भगवा विसरतात, धनुष्यबाण गहाण ठेवतात, दहशतवाद्यांना मिरवणुकांत फिरवतात आणि पाकिस्तानचे झेंडे नाचवतात, तेच काही लोक आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत,’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर टीका केली. ‘सोयीने हिंदुत्व आठवणाऱ्यांना ओळखून एकदिलाने त्यांचा मुकाबला करणे आवश्यक आहे’, असेही शिंदे म्हणाले.
पतित पावन संघटनेच्या वतीने आयोजित ‘युती हिंदुत्वाची’ कार्यकर्ता मेळाव्यात एकनाथ शिंदे बोलत होते. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उद्योगमंत्री उदय सामंत, पर्यटनमंत्री शंभूराज देसाई, गृह राज्यमंत्री योगेश कदम, खासदार श्रीरंग बारणे, पतित पावन संघटनेचे प्रांताध्यक्ष सोपान देशमुख, शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद भानगिरे या वेळी उपस्थित होते. खुर्ची दिसली म्हणून भगव्याचा रंग बदलणारा हा शिवसेना पक्ष नाही. सत्ता, खुर्ची, मोह आणि माया यापेक्षा विचारधारा मोठी आहे. खुर्ची हा आमचा अजेंडा नसून, ज्या लोकांनी आम्हाला त्या खुर्चीत बसवले त्यांच्या समस्या सोडवणे आणि विकासाचा अजेंडा राबवणे हेच आमचे ध्येय आहे’, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.







