पुणे : पुणे अपघात प्रकरणातील आरोपी मुलाच्या ब्लड सॅम्पलची अदलाबदल केल्याप्रकरणी ससून रुग्णालयाचे डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर यांच्याविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. डॉ. अजय तावरे, श्रीहरी हाळनोर आणि शिपायी अतुल घटकांबळे यांचे निलंबन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांनी काल तिघांच्या निलंबनाबाबतचा अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाला पाठवला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. पुणे हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. ससून रुग्णालयाच्या दोन्ही डॉक्टर आणि शिपायी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर आणि शिपायी अतुल घटकांबळे या तिघांचे निलंबन करण्यासाठीचा अहवाल पुणे पोलिसांमार्फत वैद्यकीय शिक्षण विभागाला पाठविण्यात आला होता. निलंबन होण्यासाठी आवश्यक असलेली कारवाई पोलिसांकडून पूर्ण करण्यात आली होती. पुणे पोलिसांच्या अहवालानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाने डॉ. अजय तावरे, श्रीहरी हाळनोर आणि अतुल घटकांबळे यांचे निलंबन करण्यात आले आहे.
पुणे अपघात प्रकरणातील आरोपी मुलाच्या ब्लड सॅम्पलची अदलाबदल केल्याचा आरोप करत पुणे पोलिसांनी सोमवारी ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे, श्रीहरी हाळनोर आणि शिपायी अतुल घटकांबळे यांना अटक केली होती. १९ मे रोजी पुण्यात अपघाताची ही घटना घडली होती. आरोपी मुलगा हा मद्यधुंद अवस्थेत भरधाव कार चालवत होता. या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेऊन त्याचे ब्लड सॅम्पल तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवले होते. पण याच ब्लड सॅम्पलमध्ये दोन्ही डॉक्टरांसह शिपायी या तिघांनी फेरफार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासाठी ३ लाख रुपये पैशांची देवाण-घेवाण देखील झाली असल्याचे तपासात उघड झाले आहे. ब्लड सॅम्पल बदलणारे ससून रुग्णालयाचे दोन्ही डॉक्टर आणि शिपायी हे सध्या पोलिस कोठडीमध्ये असून पोलिसांकडून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान, पुणे पोलिसांनी डॉ. अजय तावरे यांच्या घराची देखील झाडाझडती घेतली होती. तसंच, ससून रुग्णालयाचा शिपायी अतुल घटकांबळेच्या मोबाईलची देखील पुणे पोलिसांनी सखोल तपासणी केली. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून घटकांबळेचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. त्याच्या मोबाईलमधून अनेक वेळा डॉ. तावरे यांच्याशी संपर्क करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आता या तिघांच्या देखील या प्रकरणात अडचणी वाढल्या आहेत.