मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. सततच्या पावसाचा फटका मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही लोकल रेल्वे मार्गांवरील वाहतुकीला बसला असून अनेक गाड्या विलंबाने धावत आहेत. दरम्यान, कांजूरमार्ग आणि भांडूप स्थानकादरम्यान ओव्हरहेड वीजवाहिनीला प्लास्टिक अडकल्यामुळे मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावरील रेल्वे वाहतूक काही काळ ठप्प झाली. संबंधित तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर काम सुरू असून, ओव्हरहेड वायरवरील प्लास्टिक हटविल्यानंतर सेवा पूर्ववत करण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगर क्षेत्रासाठी ‘रेड अलर्ट’ जारी करत पुढील काही तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच ताशी ८० ते ९० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क झाली असून, हवामानाचा अंदाज लक्षात घेता नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मुसळधार पाऊस आणि संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून काही खासगी कार्यालयांनी कर्मचाऱ्यांना घरून काम (वर्क फ्रॉम होम) करण्याचा पर्याय दिला असून, काही शासकीय कार्यालयांमध्येही आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. राज्यातील सर्व यंत्रणा कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे सांगत त्यांनी नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, अत्यावश्यक काम असल्याशिवाय प्रवास करू नये आणि प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचना व इशाऱ्यांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले. दुपारनंतर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेनेही नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. झाडे, जीर्ण इमारती, मोठे जाहिरात फलक, विद्युत खांब आणि इतर धोकादायक ठिकाणांपासून सुरक्षित अंतर राखावे, झाडाखाली वाहने उभी करू नयेत तसेच समुद्रकिनारे आणि पाणथळ भागात जाणे टाळावे, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात येणाऱ्या सूचना आणि इशाऱ्यांवरच विश्वास ठेवावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या १९१६ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले असून, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा शहरभरात सतर्क ठेवण्यात आली आहे.







